- नोडल अधिकारी व सहाय्यक समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२३) :- शहरातील गृहनिर्माण संस्थांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी नोडल अधिकारी व सहाय्यक समन्वय अधिकाऱ्यांची आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी नियुक्ती केली आहे.
नोडल अधिकारी म्हणून भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार सरनाईक आणि सहाय्यक समन्वय अधिकारी म्हणून स्थापत्य विभागाचे सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सोमवारी (दि. २६) रोजी आदेश जारी केला आहे.
दरम्यान, शहरातील सोसायटी धारकांना भेडसावणाऱ्या प्रश्नासंदर्भात आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये आयुक्त शेखर सिंह यांच्यासमवेत तीन दिवसांपूर्वी महापालिकेत बैठक घेतली होती. यावेळी सोसायटी धारकांच्या समस्या सोडविण्यासाठी कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली. आयुक्त सिंह यांनी प्रशासन कृती आराखडा तयार करेल, असे आश्वासन बैठकीत दिले होते. त्यानुसार आयुक्तांनी कृती आराखडा तयार करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.


















