- सुशासनाचा देखावा उभा करणारी पालिका सपशेल अपयशी..
- अनं पाडाभाऊ साने त्यांना भासले देवदूतासारखे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जुलै २०२३) :- सुशासनाचा देखावा उभा करत आधुनिकतेचा आव आणणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चिखलीतील म्हेत्रेवस्ती दवाखान्यात आज मंगळवारी (दि. १८) रोजी पावसाच्या पाण्यामुळे अक्षरशः गळती लागली. येथील रुग्ण कक्षातही गळक्या छपरातून पाणी टिपण्यासाठी बादल्या लावाव्या लागत असल्याचा धक्कादायक प्रसंग घडला आहे. त्यामुळे दवाखान्यात आलेले रुग्ण तसेच गर्भवती महिला, जेष्ठ नागरिक आणि त्यांच्या नातेवाईकांना उपचार न घेताच माघारी फिरावे लागले. दवाखाना चहुबाजूंनी गळू लागला असून दक्षता कक्षातही गळती झाल्याने जंतुसंसर्ग होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

येथील सामजिक कार्यकर्ते पांडाभाऊ साने यांना दवाखान्यातून रुग्णांच्या नातेवाईकांनी आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संपर्क साधला. प्रसंगाची त्यांना माहिती दिली. पांडाभाऊ साने यांनी त्वरित दवाखाना गाठला. गळती लागलेल्या दवाखान्याच्या इमारतीवरील छतावर ताडपत्री टाकूली. तात्पुरती डागडुजी केली. त्यामुळे काही अंशी पावसाच्या पाण्याची गळती थांबली.
सुमारे एक लाख लोकसंख्येच्या चिखली परिसरातील नागरिकांसाठी येथील पालिकेचे सार्वजनिक आरोग्य केंद्र कणा मानले जाते. हजारो कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मिरविणारी महापालिका आरोग्य विभागावर दरवर्षी कोटय़वधी रुपयांचा खर्च करत असते. या आरोग्य केंद्रात सामान्य रुग्णांवर मोठ्या प्रमाणात उपचार होतात. त्याशिवाय प्रसूती, आंतररूग्ण विभागात मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होतात. त्यामुळे येथील व्यवस्थापन चोख असावे हा नेहमीच आग्रह राहिला आहे. मात्र, पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे येथील आरोग्य केंद्र अक्षरशः उघड्यावर आले आहे. तसेच पावसाळ्यामुळे तर येथील नागरिकांना उपचाराविना माघारी जावे लागत आहे. ही बाब श्रीमंत महापालिकेला नक्कीच शोभनीय नाही.
आज सकाळी मला मनपा दवाखाना म्हेत्रेवस्ती येथून डॉक्टर व तेथील परिचारिकांनी संपर्क साधला. दवाखान्यातील छत आणि पत्र्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यातून पावसाचे पाणी थेट दवाखान्यात पडत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. मी प्रत्यक्ष दवाखान्यात जाऊन पाहणी केली. दवाखान्यातील महत्वाचे कागदपत्रे, औषधे, इतर उपकरणे पावसाच्या पाण्यात पूर्ण भिजले होते. रुग्ण उपचाराविनाच माघारी परतत होते. मी लगेचच माझ्या कार्यकर्त्यांच्या मदतीने ताडपत्री कागद दवाखान्याच्या छत-पत्र्यावर अंथरून पाण्याचा तात्पुरता इलाज केला. याबाबत फ क्षेत्रीय कार्यालयाचे अभियंता प्रतीक बसरकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांना घटनेची माहिती दिली. त्यावर लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पावसाळ्याआधीच इमारती दुरुस्तीचे काम होण्याची गरज होती. आता पालिकेने ताबडतोब दवाखाना इतरत्र स्थलांतरीत करावा. तोपर्यंत रुग्णांसाठी पर्यायी व्यवस्था करावी.
– पांडाभाऊ साने (सामाजिक कार्यकर्ते)…












