- करातील 50 टक्के सवलत पूर्ववत करण्यासाठी अश्विनी तापकीर यांचे आयुक्तांना साकडे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जुलै २०२३) :- महिला सक्षमीकरण हा मूळ उद्देश समोर ठेवून पिंपरी चिंचवड शहरातील महिलांच्या नावाने असलेल्या निवासी मिळकतींसाठी असलेली सामान्य करात ५० टक्के सवलत हि पूर्वीप्रमाणे कायम ठेवण्याची मागणी महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस पिंपरी चिंचवड शहराच्या उपाध्यक्षा अश्विनी चंद्रकांत तापकीर यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात तापकीर यांनी म्हटले आहे कि, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सन 2011-2012 ते सन 2022-23 पर्यंत पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत महिलांच्या नावाने असलेल्या निवासी मिळकतींसाठी सामान्य करात 50 टक्के सवलत देण्यात येत होती. महिला सक्षमीकरण हा या योजनेचा एकमेव उद्देश आहे. त्यामुळे यापूर्वी शहरातील हजारो महिलांना या योजनेचा लाभ झाला आहे.
या योजनेमुळे कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांच्या नावावर मालमत्ता खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळत होते. परंतू सन 2023 – 24 पासून महिलांच्या नावे असलेल्या सामान्य करातील सवलत कमी करून 30 टक्के अशी करण्यात आली आहे. यामुळे मुल उद्देशच बंद होत असल्याने महिलांमध्ये याबाबत कमालीची उदाशीनता आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील महिलांच्या नावाने असलेल्या निवासी मिळतींसाठी सामान्य कराची 50 टक्के सवलत कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.












