न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२३) :- शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाढत्या नागरिकरणामुळे कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. कचरा डेपोसाठी २००८ मध्ये पुनावळेतील २६ हेक्टर जागा मंजूर आहे. असे असतानाही गेल्या १५ वर्षांपासून या जागेचे भिजत घोंगडे कायम आहे. तो आता निकाली लावण्यात येणार आहे. पुनावळेत वनविभागाची २२.८ हेक्टर जागा महापालिका घेणार असून, त्याबदल्यात वनविभागाने चंद्रपूर जिल्ह्यातील जागेची मागणी केली आहे. त्यानुसार महापालिकेने चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवला असून, ती खरेदी करून वन विभागाला देण्यात येणार आहे, अशी माहिती नगररचना अधिकाऱ्यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहरात दररोज ११०० टन कचरा निर्माण होतो. हा सर्व कचरा सध्या मोशी येथील कचरा डेपोत डम्पिंग केला जातो. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून खतनिर्मिती केली जाते.
मोशी येथील कचरा डेपोची निर्मिती १९९१ साली झाली आहे. हा परिसर जवळपास ८१ एकरांचा आहे. आता मोशीतील कचरा डेपोची क्षमता संपुष्टात येऊ लागली आहे. त्यामुळे पुनावळे येथे कचरा डेपो महापालिका करणार आहे.
पुनावळे भागात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्यामुळे या भागात सातत्याने नागरीकरण वाढत आहे. तथापि, पुनावळे ग्रामस्थ आणि बांधकाम व्यावसायिकांचा पुनावळेत कचरा ‘डेपोला विरोध आहे. त्यामुळे महापालिका कचरा डेपोची जागा ताब्यात घेण्यासाठी खरेच प्रयत्न करणार का? आणि कचरा डेपो सुरु होणार का? हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे
पुनावळेत वन विभागाची २२.८ हेक्टर जागा महापालिका घेणार असून, त्या बदल्यात मुळशीतील पिंपरी येथे वन विभागाला महापालिका पर्यायी जागा देणार होती. मात्र, या ठिकाणी मुरूम असल्याने वन विभागाने या जागेचा पर्याय नाकारला आहे. पुनावळेतील जागेवर वृक्ष आहेत, याठिकाणी कचरा डेपो झाल्यास येथील झाडे तोडावी लागतील. त्यामुळे वन विभागाला झाडे लावण्यासाठी जागा देणे बंधनकारक आहे. त्यासाठी वन विभागाने चंद्रपूर जिल्ह्यातील जागेचा पर्याय सुचविला होता. महापालिकेने ती जागा शोधण्यास सुरुवात केली असून, चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार सुरू केला आहे.












