न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२३) :- मोशी येथे पेठ क्रमांक ६ मध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) विकसित केलेले १४ रो-हाऊस भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहे. रो-हाऊसची किंमत १ कोटी २६ लाखापर्यंत असून पुढील महिन्यात त्यासाठी ई-लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे उपजिल्हाधिकारी तथा जनसंपर्क अधिकारी रामदास जगताप यांनी दिली.
हवेली तालुक्यातील मौजे मोशी, पेठ क्रमांक ६ येथील भूखंड क्रमांक ८७ ते १०४ येथील गृहयोजना क्रमांक ३ मध्ये १४ रो-हाऊसेस विकसित केले आहेत. रो हाऊसच्या भूखंडाचे क्षेत्रफळ कमीत कमी १९०.८६ चौरस मीटर व जास्तीत जास्त २५१.५३ चौरस मीटर आहे. रो-हाऊसची विक्री किंमत कमीत कमी १ कोटी ११ लाख ३७ हजार ३२० आणि जास्तीत जास्त १ कोटी २६ लाख ६ हजार ७४८ एवढी आहे. रो हाऊसच्या किंमतीत २ टक्के अनामत रक्कम व फॉर्म शुल्क ५ हजार रुपये असणार आहेत.
रो-हाऊस वाटप करण्यासाठी घेण्यात येणा-या ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी लिलावधारकांना https://eauction.gov.in संकेतस्थळावर ११ जुलै ते १० ऑगस्ट सायंकाळी पाचपर्यंत नाव नोंदणी करावी लागेल. संपूर्ण लिलाव प्रक्रिया ऑनलाइन पध्दतीने याच संकेतस्थळावर राबविण्यात येणार आहे. ३१ ऑगस्ट रोजी ई- लिलाव प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. त्याची माहिती प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर (https://pmrda. gov.in) उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुकांनी लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त राहुल महिवाल यांनी केले आहे.












