न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जुलै २०२३) :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यकारिणीत जनतेत स्थान असणाऱ्या नेत्यांना सामावून घेण्याच्या दृष्टीकोनातून शहराच्या कार्याध्यक्षपदी माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांची आज नियुक्ती करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भोंडवे यांना निवडीचे पत्र दिले.
पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. तो अधिकाधिक मजबूत रहावा या दृष्टीकोनातून आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या नेत्यांना कार्यकारिणीत सामावून घेण्यात येत आहे. त्याच भूमिकेतून बुधवारी (दि. १९) अध्यक्षांसह पाच कार्याध्यक्षांची नियुक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात जाहीर केल्या आहेत. त्यानंतर आज भोंडवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मोरेश्वर भोंडवे हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आहेत. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघासोबत येणाऱ्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर सक्षम आणि जनतेमध्ये स्थान असणाऱ्या नेत्यांना राष्ट्रवादीकडून कार्यकारणीमध्ये स्थान देण्यात येत आहे.















