- वीजेचा अपव्यय आणि आवश्यक त्या ठिकाणी होणार वीजेची बचत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०२३) :- वीजेचा अपव्यय टाळण्यासाठी आणि आवश्यक त्याठिकाणी वीजेची बचत करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पाऊल उचलले असून महापालिकेची प्रशासकीय कार्यालये, सर्व रुग्णालये, नाट्यगृहे आदी ठिकाणी वीज बचतीच्या दृष्टीने गती संवेदक यंत्रणा म्हणजेच मोशन सेंन्सर बसविण्यात येणार आहे.
आयुक्त शेखर सिंह यांनी दिलेल्या सुचनेनूसार सर्व विभागांना याबाबत स्वतंत्र परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. विद्युत विभागाचे सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक निर्गमित करण्यात आले असून सर्व विभागांना याबाबत अवगत करण्यात आले आहे.
महापालिकेच्या पिंपरी चिंचवड प्रशासकीय इमारतींमध्ये दिवाबत्ती करीता विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी प्रत्यक्ष वीजेचा वापर आवश्यक नसताना देखील वीजेचे दिवे चालू असतात, यामुळे नाहक वीजेचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आल्याने आयुक्त शेखर सिंह यांनी मोशन सेंन्सर बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाहक होणारा वीजेचा अपव्यय टाळण्यासाठी मोशन सेंन्सरचा वापर केला जाणार असून व्यक्तीच्या हालचालींनुसार दिवे चालू अथवा बंद करणारी स्वयंचलित यंत्रणा या माध्यमातून कार्यान्वित होणार आहे.
महापालिकेच्या सर्व प्रशासकीय इमारती, रुग्णालये, नाट्यगृहांचा आतील सार्वजनिक परिसर, स्वच्छतागृहांमध्ये मोशन सेंन्सर बसविले जाणार असून विद्युत
विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी करून अशी ठिकाणे निवडली जाणार आहेत. अशा यंत्रणेमुळे वीजेचा नाहक होणारा वापर टाळण्यास मदत होणार असून वीजेची बचत होईल, असे सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले यांनी सांगितले आहे.















