- पालिकेने ठेकेदाराला ठोठावलायं दंड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०२३) :- निगडी येथे सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी जय ट्रेडर्ससमोर पादचारी भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. मुदत संपूनही काम सुरू आहे. तीन महिन्यांच्या मुदतवाढीनंतरही संथ गतीने काम केल्यास दररोज दोन हजार रुपयांचा दंड संबंधित ठेकेदाराला करण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाचे प्रमुख सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.
सहशहर अभियंता अभासे यांनी सांगितले की, भुयारी मार्गाचे काम बी. के. खोसे ठेकेदार कंपनी करीत आहे. त्याची १५ महिन्यांची मुदत ८ जून २०२३ ला संपली आहे. मुदत संपल्यानंतर सध्या काम सुरू आहे. हे काम ३० टक्के पूर्ण झाले आहे. वाहतूक पोलिसांनी दोन्ही बाजूने मार्ग बंद करून काम करण्यास परवानगी न दिल्याने या कामास विलंब झाला आहे. त्यामुळे ३ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्या मुदतीमध्ये म्हणजे ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत काम पूर्ण करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. त्यानंतर ९ सप्टेंबर ते ८ डिसेंबर या ३ महिन्यांच्या मुदतवाढीत दररोज २ हजार रुपयांचा दंड संबंधित ठेकेदाराला करण्यात येणार आहे. संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी दररोज १ हजार रुपये दंडाची शिफारस केली होती. ती दुप्पट केली आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी निगडीत भुयारी पादचारी पुलाचे काम करण्यात येत आहे. मात्र, वाहतूक पोलिसांनी वेळेत परवानगी न दिल्याने कामास विलंब झाला. त्यात भरपूर वेळ गेला. तसेच, एकाच मार्गावर काम करण्यास परवानगी दिली. त्यामुळे काम संथ गतीने झाले. आता ३ व ३ अशी एकूण ६ महिन्यांची मुदतवाढ ठेकेदाराला दिली आहे. तीन महिन्यांच्या मुदतीनंतर दररोज २ हजारांचा दंड आकारला जाणार आहे, असे सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.


















