- तळेगावात साकारतोय आयआयआयटी पुणेचा नवा कॅम्पस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०२३) :- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणेचा (आयआयआयटी पुणे) नवा कॅम्पस जून २०२४ पासून तळेगाव दाभाडेजवळील नानोली गावातील १०० एकर जागेवर सुरू होण्याची शक्यता आहे. या जागेवर सद्य:स्थितीत शैक्षणिक इमारत, तीन वसतिगृहे, प्राध्यापकांसाठी क्वॉर्टरची सुविधा निर्माण करण्यात येत आहे. या कॅम्पसद्वारे नव्या शैक्षणिक सुविधा आणि अभ्यासक्रम सुरू करण्यास मदत होणार आहे, अशी माहिती आयआयआयटी पुणेचे कुलसचिव एच. एन. साहू यांनी दिली.
आयआयआयटी पुणेच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत आयोजित पत्रकार परिषदेत साहू बोलत होते. या वेळी अधिष्ठाता डॉ. रितू तिवारी, विभाग प्रमुख चंद्रकांत गुछेद, डॉ. संदीप मिश्रा, डॉ. वैदुर्या जैन आदी उपस्थित होते.
साहू म्हणाले, ‘केंद्र सरकारचा नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा असलेले आयआयआयटी पुणे हे पब्लिक, प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर (पीपीपी मॉडेल) २०१६ पासून सुरू करण्यात आले. मात्र, कॅम्पससाठी स्वतःची जागा नसल्याने आतापर्यंतचे शैक्षणिक वर्ग आणि प्रशासकीय कामकाज हे ट्रान्झिट कॅम्पसमधून सुरू आहे. आता कॅम्पसच्या उभारणीसाठी राज्य सरकारने नानोली गावातील १०० एकर स्वतंत्र जागा दिली असून, त्यावर कॅम्पसच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारने १२८ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. हा निधी बांधकामाच्या टप्प्यानुसार मिळणार आहे. जून २०२४ पर्यंत कॅम्पसचे बांधकाम पूर्ण करण्याचे प्रयत्न आहे.
आयआयआयटी पुणेच्या वतीने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बहुशाखीय शिक्षणासोबतच मल्टिपल एन्ट्री आणि एक्झिटचा पर्याय राहणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आंतरविद्याशाखीय शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी शॉटटर्म क्रेडिट कोर्स शिकता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना आणि कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्टुडन्ट क्लबची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. तिवारी यांनी दिली.












