- आधी अपहरण अनं नंतर खुन करून ताम्हिणी घाटात लावली विल्हेवाट..
- गुन्हे शाखा युनिट दोन व चिंचवड पोलीसांनी तिघांना ठोकल्या बेड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२३) :- उसने दिलेले पैसे परत मागणाऱ्या चिंचवडगावातील वृद्धाचे अपहरण करून त्यांचा खुन करुन मृतदेहाची ताम्हीणी घाटात विल्हेवाट लावणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखा युनिट दोन व चिंचवड पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी जेरबंद केले आहे.
नारायण बापुराव इंगळे (रा. चिंचवडगाव), राजेश नारायण पवार, समाधान ज्ञानोबा म्हस्के (दोघे रा. चिखली) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चिंचवड पोलीस स्टेशन येथे एका इसमास ठार मारण्याच्या उद्देशाने त्याचे अपहरण करुन जबरदस्तीने त्याच्याच ब्रेझा गाडी मधुन पळवून नेल्याचा गुन्हा चिंचवड पोलीस स्टेशन येथे दाखल होता. (गुन्हा रजि. नंबर ३१५/२०२३ भा.दं.वि. कलम ३६४, ३९२ ३४) या गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना त्यातील आरोपी नारायणला चिंचवड पोलीस स्टेशनच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याचेकडे तपास केला असता, नारायण याने पंजाब सिंध बँकेत मॅनेजर या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या रणजित मेला सिंग (वय ७० वर्षे, रा. ओरा कौटी, प्लॅट नं. सी-१ प्लॅट नं. ९०४, उबाळे नगर, वाघोली, पुणे) यांच्याकडुन ३० लाख रुपये इसने घेतले होते. ते पसे परत दे म्हणुन रणजित सिंग यांनी नारायण इंगळे याच्याकडे सतत तगादा लावला. नारायणला ते पैसे परत करायचे नसल्याने त्याने त्याचे मित्र राजेश आणि समाधान यांना रणजित सिंग यांचा खुन करण्यासाठी ४ लाख रुपयांची सुपारी दिली होती. नारायण याने रणजित सिंग यांना (दि. १९/०४/२०२३) पैसे देतो म्हणुन बोलावुन घेतले. तिघांनी मिळुन त्यांचे अपहरण करुन खुन केला. त्यांच्या मृतदेहाची व गाडीची विल्हेवाट राजेश आणि समाधान यांनी लावली.
लागलीच गुन्हे शाखा युनिट ०२ कडील पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक गणेश माने, पोलीस हवा. ४४३ प्रमोद वेताळ, पोलीस हवा. ८३२ जयवंत राऊत, पोलीस नाईक १६०३ देवा राऊत यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेतला. गुन्हयातील आरोपी हे चिखली घरकुल परीसरात असल्याबाबतची माहिती मिळाली. गुन्हे शाखा युनिट दोनकडील स्टाफने वेशांतर करुन आरोपींचा घरकुल चिखली परीसरात शोध घेवुन सापळा रचुन शिताफीने आरोपींना घरकुल चौक, चिखली परीसरातून ताब्यात घेतले. त्यांच्या कडे सदर गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता आम्हास काहि माहिती नाही, आम्ही नारायण इंगळे यांना ओळखत नाही. आम्हांला कशाला पकडले आम्ही काही केली नाही, अशी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांना गुन्हे शाखा युनिट ०२ कार्यालयात आणुन त्यांचेकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
आरोपींनी सागितले की, त्याचा मित्र नामे नारायण याने त्यांना ४ लाख रुपयाची सुपारी दिली असुन त्या बदल्यात रणजित सिंग यास ठार मारुन त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची. नारायण इंगळे व राजेश पवार यांनी मागुन येवुन रणजित सिंग यांचा दोरीने गळा आवळुन व समाधान म्हस्के याने चाकुने चार ते पाच वेळा भोकसुन ठार मारले. त्यांनतर त्याचा मृतदेह प्लास्टिक मध्ये गुंडाळुन बेडशिटमध्ये बांधुन रणजित सिंग यांच्या लाल रंगाच्या ब्रेझा गाडीत टाकुन त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट ताम्हीणी घाटात धबधब्या जवळच्या नाल्यात टाकून व गाडी माणगाव एम.आय.डी.सी. परीसरात सोडल्याचे सांगितले. आरोपींनी मयत इसमाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावलेले ठीकाण व गाडी सोडल्याचे ठीकाण दाखवुन दिले. त्याप्रमाणे पोलीसांनी मयत इसमाचा मृतदेह व गाडी ताब्यात घेतली असुन अधिक तपास चालु आहे.
हि कारवाई विनयकुमार चोबे पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे पोलीस सह आयुक्त, वसंत परदेशी अप्पर पोलीस आयुक्त, स्वप्ना गोरे पोलीस उप-आयुक्त (गुन्हे). सहा. पोलीस आयुक्त सतिश माने गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ०२ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, कृष्णदेव खराडे व.पो.नि.. प्रकाश जाधव, पो.नि. (गुन्हे), चिंचवड पोलीस स्टेशन, पोलिस उप- निरीक्षक गणेश माने, पोलीस उप-निरीक्षक शंभु रणवरे, गुन्हे शाखा युनिट ०२ कडील पोलीस अंमलदार जयवंत राऊत, प्रमोद वेताळ, देवा राऊत जमिर तांबोळी, संतोष इंगळे, सागर अवसरे, विपुल जाधव, आतिष कुडके चिंचवड पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार पांडुरंग जगताप, धर्मनाथ तोडकर, पंकज बदाणे, उमेश वानखेडे यांच्या पथकाने कारवाई केली.












