न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२३) :- दहावी आणि बारावी परीक्षा अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुर्नपरीक्षा सुरू झाली आहे. या परीक्षेसाठी नाव नोंदणी करत विद्यार्थ्यांनी अभ्यासाची तयारी देखील सुरू केली होती. त्यानुसार परीक्षा सुरू झाली असून या परिक्षेला पिंपरी -चिंचवड शहरातून दहावी आणि बारावीसाठी दोन हजार ४२६ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. शहरात संत तुकाराम, पिंपरी येथील जैन संघटना शाळेत त्यांचे परीक्षा केंद्र आहे.
अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षेसाठी शहरातील विद्यार्थ्यांकडून तयारी सुरू करण्यात आली होती. परीक्षा केंद्रावर तयारी देखील पूर्ण झाली होती. विद्यार्थ्यांचे क्रमांकही सुनिश्चित करण्यात आले होते. त्यानुसार परिक्षेला सुरूवात झालेली आहे. ही परीक्षा एक ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.
दहावी आणि बारावीच्या मुख्य परीक्षेला मात्र शहरातून १९ हजार २८२ विद्यार्थी बसले होते. पुर्नपरीक्षार्थीमध्ये शहरातील अडीच हजार विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. यामध्ये दहावीच्या परीक्षेला ९४५ आणि बारावीसाठी १ हजार ४८१ विद्यार्थी संख्या आहे.












