- त्या बड्या बिल्डरांविरोधात पोलिसात तक्रार दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२३) :- पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रस्ता येथे सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात केलेल्या खोदकामामुळे महापालिकेचा सार्वजनिक रस्ता खचला. तसेच, जलवाहिनी, स्ट्रॉम ‘वॉटरवाहिनी तसेच इतर सेवावाहिन्या तुटल्या. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याने बांधकाम व्यावसायिकांच्या विरुद्ध महापालिकेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच, ते बांधकाम थांबविण्याची कारवाई महापालिकेने केली आहे.
ही घटना गुरुवारी (दि. २०) पहाटे घडली. सुदैवाने केली आहे. कोणतीही जीवित हानी घडली नाही. या प्रकरणी पालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाचे उपअभियंता विनायक माने तसेच, कनिष्ठ अभियंता सुशीलकुमार लवटे,पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता जयराम कानडे यांनी सांगवी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि. २१) तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, पिंपळे सौदागर येथील सर्वे क्रमांक ६८/१, ६८/२, ६९/१८ पैकी येथील खासगी जागेवर सुखवानी रामचंदानी एलएलपीतर्फे भागीदार घनश्याम सुखवानी व संजय रामचंदाणी यांच्याकडून व्यापारी व निवासी इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीसाठी पालिकेच्या बांधकाम विभागाची परवानगी घेण्यात आली आहे. या ठिकाणी २ मजली तळमजला अधिक ७ मजली उंच इमारत बांधण्यात येणार आहे. इमारतीच्या पायासाठी मोठ्या प्रमाणात खोलवर खोदकाम करण्यात आले आहे. खोदकाम करून पायलिंग पद्धतीने सीमाभितीचे काम करण्यात आले आहे. या कारणामुळे सुमारे ५० मीटर लांबीची संरक्षक भिंत ढासळून पालिकेची २ मीटर रुंद व ४० मीटर लांब रस्ता खचून तुटला. तसेच, जलवाहिनी, स्ट्रॉम वॉटरवाहिनी आणि इतर सेवावाहिन्या बांधकाम व्यावसायिकांच्या निष्काळजीमुळे पालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे.












