- शिवसेनेचा ठाकरे गट पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा सक्रीय..
- चिंचवड मतदारसंघात प्रभाग, शाखानिहाय भेटीगाठी आणि बैठकांना उस्फुर्त प्रतिसाद..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑगस्ट २०२३) :- ‘शिवसेना ही कायम विरोधी पक्षात राहून वाढलीय’, ‘रस्त्यावर उतरून आंदोलन करून वाढलीय,’ पण जसं पक्ष वाढवण्यासाठी विरोधात राजकारण करण्याची गरज असते, तसंच पक्ष आणि कार्यकर्ते टिकवण्यासाठी सत्तेचीसुद्धा गरज असते. त्या सत्तेच्या गरजेतूनच मग राज्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रुपात दुसऱ्यांदा शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला होता. त्यामुळे पक्षाला एक वेगळे स्थान मिळाले आहे. मात्र, पक्षातीलच गद्दारांनी फितुरी करीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बेईमानी केली आणि आपल्या शत्रू पक्षाला जाऊन मिळत त्यांची स्वतंत्र चूल मांडली. पक्षाची फोडाफोड केली. असे असले तरी पक्षाचा आक्रमकपण अजूनही कमी झालेला नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पूर्णवेळ पक्ष सांभाळत आहेत. पक्षाला पूर्णवेळ नेतृत्व मिळत आहे. उद्धव ठाकरे हे पक्षाला वेगवेगळे कार्यक्रम देत आहेत. त्यामुळे शिवसैनिकांनो पेटती मशाल पुन्हा हाती घ्या, पक्षाची विस्कटलेली घडी एकत्र करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे चिंचवड विधानसभा संपर्कप्रमुख दिलीप घोडेकर यांनी शिवसैनिकांना केले आहे.
आगामी महापालिका आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेना नेते तथा खा. संजय राऊत, उपनेते तथा समन्वयक रवींद्र मिर्लेकर, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख तथा आ. सचिन अहिर यांच्या आदेशानुसार मंगळवारी (दि. ८) रोजी सायंकाळी चिंचवड विधानसभेतील प्रभाग क्रमांक १६, १७, १८, २२, २५, २७ परिसरातील वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा, किवळे, मामुर्डी, रावेत, चिंचवड गावठाण, पुनावळे, रहाटणी, काळेवाडी, ज्योतिबानगर, तापकीरनगर, विजयनगर, पवनानगर, आदर्शनगर नढेनगर, विजयनगर, कोकणेनगर, ज्योतिबानगर, येथे चिंचवड विधानसभा संपर्कप्रमुख दिलीप घोडेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग आणि शाखानिहाय भेटीगाठी तसेच बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी दिलीप घोडेकर हे बोलत होते.
यावेळी चिंचवड विधानसभा संपर्क प्रमुख दिलीप घोडेकर, उपजिल्हाप्रमुख हाजी दस्तगीर मनीयार, शहर संघटीका अनिता तुतारे, शहर निवडणूक प्रभारी अशोक वाळके, शहर समन्वयक कैलास नेवासकर, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हळे, शहर संघटक संतोष सौंदणकर, दिलीप भोंडवे, ज्येष्ठ शिवसैनिक संजय दूर्गुळे, दिपक काळे, बाबासाहेब भोंडवे, मल्हार देशमुख, अरुण आंब्रे, मुकुंद देशमुख, सुभाष घायवट, रमेश नरवडे, उपशहरप्रमुख नवनाथ तरस, श्रीमंत गिरी, संतोष पवार, हरेश नखाते, विभाग प्रमुख संदीप भालके, नितीन दर्शले, कुदरत खान, सचिन सांडभोर, भरत साळुंखे, ॲड. चेतन कलाटे, गोरख पाटील, मारुती दाखले, सागर शिंदे, बाळासाहेब येडे पाटील, महिला आघाडीच्या योगिनी मोहन, ज्योती भालके, तराना सय्यद, वैशाली काटकर, कलावती नाटेकर, सविता सोनवणे, सुजाता नखाते, तस्लिम शेख व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हळे म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर कोरोनाचं संकट आलं. काही काळ लॉकडाऊन होता. लोकांचा जीव धोक्यात होता. अशा काळात उद्धव साहेबांची चांगली प्रतीमा घराघरात पोहोचली. कोरोनाच्या काळात मी तुमच्याच कुटुंबातला एक आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांना यश आलं. शिवभोजन थाळीसारखे उप्रकम त्यांनी मुख्यमंत्री असताना राबविले. कोरोनाच्या काळात अनेक शिवसैनिकांनी स्वतः पीपीई किट घालून रुग्णवाहिका चालवून लोकांना मदत केली. मोठ्या प्रमाणावर रक्तदानाच्या मोहिमा आपण राबवत आहोत. शिवसेनेचं हे मोठं समाजकार्य लोकांना दिसून येत आहे. त्यामुळे लोकं शिवसेनच्या पाठीशी आहेत. आगामी निवडणुकीत आपल्याला गद्दारांना त्यांची जाग दाखवून द्यायची आहे. त्यासाठी लोकांमध्ये जा, त्यांना प्रेरित करा; मग विजय आपलाच आहे.
शहर संघटक संतोष सौंदणकर म्हणाले, “शिवसेना स्थापनेपासूनच जातीपातींपासून दूर राहिली आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी कुठल्याही जातीबद्दल आप-परभाव बाळगला नव्हता. म्हणून उपेक्षित जातींमधून शिवसेनेनं लोकांना स्थानिक स्वराज्य संस्था ते विधीमंडळापर्यंत प्रतिनिधित्व दिलं. तोच न्याय यापुढेही कायम राहील. शिवसेना हा पक्ष निष्ठावंत शिवसैनिकांच्या सदैव पाठीशी राहतो, हे विसरू नका.

















