न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑगस्ट २०२३) :- चिंचवडच्या श्री. शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात ७७ वा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून इस्रोचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ अरुण कुमार सिन्हा यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष जगदीश जाधव, पालक संघाचे अध्यक्ष ऍड गट्टे, रक्षा मंत्रालयाचे पूर्व वैज्ञानिक अधिकारी कमलकांत मुलका, रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल सरवदे, सचिव संजय जाधव, संचालक विजय जाधव आदी उपस्थित होते.
अरुण कुमार सिन्हा यांनी विद्यार्थ्यांना चांद्रयान मोहीम तीनमध्ये शास्त्रज्ञांनी केलेल्या कामगिरीचे वर्णन केले. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी विज्ञान विषय घेऊन शास्त्रज्ञ व्हावे आणि देशाचा नावलौकीक वाढवावा, अशी इच्छा व्यक्त केली. देशाच्या जडणघडणीमध्ये शास्त्रज्ञांचा वाटा मोठा आहे, हे प्रामुख्याने त्यांनी नमूद केले.
तसेच संस्थेने विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध करून दिलेल्या सर्व प्रयोगशाळा यामध्ये गणित प्रयोगशाळा, भूगोल प्रयोगशाळा संस्कृत प्रयोगशाळा, इंग्रजी प्रयोगशाळा, ग्रंथालय, सायन्स सेंटर इ. भौतिक व शैक्षणिक सुविधांची पाहणी करून विद्यालयातील उपक्रम आणि विदयार्थ्यांना मिळत असलेल्या यशाचे विशेष कौतुक केले. विदयार्थ्यांच्या वतीने तनिष्का हिरे या चिमकुल्या विद्यार्थिनीने देशप्रेमाबद्दल आपले विचार व्यक्त केले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य बाळाराम पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक साहेबराव देवरे, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, उपमुख्याध्यापक किसन अहिरे, सुषमा संधान, छाया ओव्हाळ, मनिषा जाधव व इतर सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन क्रीडाशिक्षक शब्बीर मोमीन, प्रास्ताविक दत्तात्रय भालेराव यांनी तर सुषमा संधान यांनी आभार मानले.















