- शहराचा आणखी कायापालट करण्यासाठी पालिकेची धडपड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२३) :- चिंचवड येथे सिटी सेंटर उभारण्यासाठी ३४ एकर आणि नेहरूनगर येथे क्रीडा संकुल उभारण्यासाठी अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील २४.५ एकर जागा खासगी विकसकाला तब्बल ६० वर्षांसाठी विकसनासाठी देण्यात येणार आहे. ३० ऐवजी ६० वर्षांसाठी या दोन्ही जागा विकसकाला देण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर आता हा प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची चिंचवड स्टेशन येथील पुणे-मुंबई जुन्या महामार्गाशेजारील सायन्स पार्कसमोर ३४ एकर मोकळी जागा आहे. या जागेत सिटी सेंटर नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापारी संकुल उभारण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. या सिटी सेंटरमुळे शहराची ओळख, पर्यटन, जीडीपी वाढणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. या प्रकल्पासाठी केपीएमजी या खासगी सल्लागार एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेच्या धोरणानुसार एखादा भूखंड विकसित करण्यासाठी पालिकेकडून जास्तीत जास्त ३० वर्षासाठी भूखंड देण्यात येतो. याबाबत विविध विकसक व सल्लागार यांच्याशी चर्चा केल्यानंतर विकसकांकडून विशिष्ट प्रकारचे प्रकल्प सिटी सेंटर अंतर्गत करावयाचे झाल्यास किमान ६० वर्षांसाठी दिल्यास विकसक अशा प्रकारचे प्रकल्प करण्यासाठी पुढे येतील. ३० वर्षांचा कालावधी हा अत्यंत कमी आहे. त्यामध्ये विकसकाची गुंतवणूक निधी परत मिळत नाही, असा दावा स्थापत्य प्रकल्प विभागाने केला आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकणी नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिमयची २४.५ एकर जागा आहे. शहराची लोकसंख्या ३० लाखांपर्यंत पोहोचली आहे. अद्याप शहरात इतर शहराप्रमाणे अद्ययावत क्रीडा संकुल नाही. मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्समधील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमार्फत विकसकाने विकसित करून एक चांगल्या प्रकारचे क्रिकेट स्टेडियम शहराला उपलब्ध झाले आहे. त्या धर्तीवर अण्णासाहेब मगर स्टेडियम विकसकांमार्फत विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी तांत्रिक सल्लागारांची नेमणूक करून तांत्रिक सल्ला मागविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा भूखंडसुध्दा ६० वर्षांसाठी विकसित करण्यासाठी दिल्यास चांगल्या प्रकारचे विकसक येऊ शकतील, असा दावा स्थापत्य प्रकल्प विभागाने केला आहे. त्यासाठी सिटी सेंटर व मगर स्टेडिमयची जागा ३० ऐवजी ६० वर्षांसाठी विकसकाला देण्याचा प्रस्ताव स्थापत्य प्रकल्प विभागाने सर्वसाधारण सभेसमोर ठेवला होता. त्या प्रस्तावाला आयुक्त सिंह यांनी मंजुरी दिली आहे.


















