- भाजपचे युवा नेते पांडाभाऊ साने यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२३) :- चिखली मोरेवस्ती परिसरात असंख्य नोकरदार व कामगारवर्ग वास्तव्यास आहेत. रात्री-अपरात्री हे कामगार कामावरून घरी असताना त्यांच्यावर लुटीसाठी दबाव धरून बसलेले हल्लेखोर अचानक हल्ला करतात. नुकतेच रात्रीच्या सुमारास साने चौक परिसरात अशाच काही लुटारू गुंडानी कामगारांवर कोयत्याने वार करीत त्यांना गंभीर जखमी केले होते. त्यामुळे चिखली परिसरातील मोरे वस्ती, अष्टविनायक चौक, अंगणवाडी रोड, साने चौक येथे दहशतीचे वातावरण आहे. नागरिक भयभीत आहेत. शाळेत जाणारे विद्यार्थी आणि पालक देखील असुरक्षित आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते पांडाभाऊ साने यांनी पिंपरी चिंचवड शहर पोलिसांकडे परिसरातील शाळा, महाविद्यालयांच्या आवारात पोलीसगस्त वाढविण्याची मागणी केली आहे. नुकतेच पोलीस आयुक्तांना भेटून त्यांनी निवेदन दिले आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरातील मोरे वस्ती (अष्टविनायक चौक, अंगणवाडी रोड-साने चौक) येथील शाळेमध्ये शिकणाऱ्या मुला-मुलींची सुरक्षितता धोक्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मोरे वस्ती, चिखलीमध्ये काही गुंडांकडून कंपनी कामगारांवर कोयत्याने हल्ला करीत लुटमारीची गंभीर घटना घडली होती. त्यामुळे शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता उघड्यावर पडली आहे.
परिसरातून मोठ्या संख्येने पालक आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी जात असतात. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी काही गुंड प्रवृत्तीची टोळकी शाळेत येण्या-जाण्याच्या मार्गावर चौकात तसेच रस्त्यावर आडबाजुला ग्रुप करून उभे रहतात. संबंधित टोळक्याकडून शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच विद्यार्थिनींना दहशतीचे वातावरण निर्माण करून त्रास दिला जातो. अनेक वेळा शाळेतील विद्यार्थ्यांना काही टोळक्याकडून मारहाणसुद्धा केली जाते. पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाळांच्या वेळेत शाळांच्या आवारात व रस्त्यावर पोलिसांचा वावर आणि परिसरात पोलीस गस्त वाढवावी, असे या निवेदनात पांडाभाऊ साने यांनी म्हटले आहे.















