न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२३) :- चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते चतुर्थीपर्यंत असे चार दिवस मंगलमूर्ती द्वारयात्रा काढली जाते. श्रावण महिना सुरू झाल्याने मंगलमूर्ती द्वार यात्रेला गुरुवारी (दि. १७) प्रारंभ करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी पूर्वद्वार अर्थात चिंचवड स्टेशन येथील श्री मांजराई देवी येथे यात्रा काढण्यात आली होती. येत्या रविवारी या यात्रेचा समारोप होणार आहे.
श्री मंगलमूर्ती वाड्यातून देवस्थानचे विश्वस्त मंदार देव महाराज यांच्यासह वाजत गाजत भाविकांचा समुदायांसह ही द्वार यात्रा निघाली. महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन यात्रेला प्रारंभ झाला. श्री मांजराई देवी येथे पोहोचल्यावर द्वार देवतेचे पूजन, गोंधळ, जोगवा असे धार्मिक विधी करण्यात आले. परत येताना मोरया गोसावी समाधी मंदिरात यात्रेचा समारोप झाला.
श्रावण महिन्यात पहिले चार दिवस चिंचवड स्टेशन, काळेवाडी, निगडी रामाडीचा डोंगर आणि आकुर्डी या ठिकाणी मांजराई, आसराई, ओझराई आणि मुक्ताई या चार द्वार देवतांची यात्रा करून पूजा केली जाते. पुन्हा आल्यावर उरलेली धूपारतीची पदे घाटावर केली जातात.
गुरुवारी (दि. १७) पहिल्या दिवशी पूर्व द्वार अर्थात चिंचवड स्टेशन एम्पायर इस्टेट येथील श्री मांजराई देवी येथे द्वार यात्रा काढण्यात आली. शुक्रवारी (दि. (१८) दक्षिण द्वार अर्थात काळेवाडी येथील श्री आसराई देवी येथे यात्रा काढण्यात येणार आहे. शनिवारी (दि. १९) पश्चिम द्वार निगडी, रामाडीचा डोंगर येथील ओझराई देवी व रविवारी (दि. २०) उत्तर द्वार अर्थात आकुर्डी येथील मुक्ताई देवी येथे द्वार यात्रा काढण्या येणार आहे. द्वारयात्रेचे प्रस्थान सकाळी ९.३० वाजता श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिरापासून होते.















