न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑगस्ट २०२३) :- राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड शहरासाठी एक अपर आयुक्त आणि दोन उपायुक्त या पदांना मंजुरी दिली. त्यानुसार, आता दोन पोलिस उपायुक्तांची बदली पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या आस्थापनेवर करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. (१८) गृहविभागाने याबाबत आदेश दिले आहेत.
युसीटीसी फोर्स वन मुंबई येथे पोलिस अधीक्षक असलेले संदीप डोईफोडे आणि महाराष्ट्र पोलिस अकादमी नाशिक येथे अपर पोलिस अधीक्षक असलेले शिवाजी पवार या दोन अधिकाऱ्यांची पिंपरी-चिंचवड शहरात पोलिस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील उपायुक्तांची संख्या पाच इतकी झाली आहे.
आगामी काळात झोनची संख्या वाढवण्यात येणार आहे. त्यानुसार नवीन आलेल्या उपायुक्तांची नियुक्ती करण्यात येईल; मात्र तोपर्यंत वाहतूक आणि मुख्यालयाचा स्वतंत्र पदभार देण्याची शक्यता आहे.


















