- जयंती-महोत्सवासाठी तुटपुंजा भूखंड देऊन केली बोळवण..
- पीएमआरडीएच्या या निर्णयाला समितीचा विरोध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२३) :- निगडी भक्ती-शक्ती चौक येथील सेक्टर क्रमांक २४ मधील वाणिज्य भूखंडाची जागा शिवजयंती, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती, गावजत्रा महोत्सव घेण्यासाठी राखीव ठेवण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केली होती. मात्र, त्या जागेची ई-लिलावद्वारे विक्री केल्याने आता पुन्हा ती जागा उपलब्ध करुन देणे शक्य नाही. त्यामुळे पीएमआरडीएने त्या जागेच्या बदल्यात यमुनानगर गावठाणात एक एकरचा भूखंड उपलब्ध करुन महापालिकेकडे हस्तांतरित केला आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) निगडी भक्ती-शक्ती चौक, सेक्टर २४ येथील मोकळ्या भूखंडावर शिवजयंती, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती, गावजत्रा महोत्सव आदी प्रबोधनात्मक व सामाजिक कार्यक्रम घेतले जातात. मात्र, येथील पाच भूखंड वाणिज्य वापरासाठी असून पीएमआरडीएने त्याची ई-लिलाव प्रक्रिया राबवून विक्री केली आहे.
भक्ती-शक्ती उत्सव समितीच्या कार्यकत्यांनी पीएमआरडीएच्या विरोधात आंदोलने, निदर्शने केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जागेची मागणी केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर कार्यक्रमात ही जागा उपलब्ध करुन देण्याचे आदेश पीएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल महिवाल यांना आदेश दिले. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील जयंती उत्सव समितीने जागा राखीव ठेवण्याबाबत मागणी केली होती. तथापि, पीएमआरडीएने निगडी गावठाणाला लागून सेक्टर क्रमांक २१ येथील सर्व्हे क्रमांक ८३ मधील खुली जागा क्रमांक ९ हा एक एकरचा भूखंड देण्याचा निर्णय घेतला. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे १८ ऑगस्ट रोजी जागेचे हस्तांतरण करण्यात आल्याची माहिती पीएमआरडीएकडून देण्यात आली.
पीएमआरडीएच्या या निर्णयाला समितीने विरोध दर्शविला आहे. आम्हाला विश्वासात न घेता बिल्डरच्या दबावाखाली हा निर्णय घेतला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे. तसेच यमुनानगर गावठाणातील एक एकर जागा वाहनतळालासुध्दा पुरेसी ठरणार नाही, असे म्हटले आहे.
“शहरातील विविध सामाजिक संघटनांनी उपलब्ध करुन दिलेल्या जागेचा शिवजयंती, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, गावजत्रा महोत्सव आदी सामाजिक कार्यक्रम व उपक्रम घेण्यासाठी वापर करावा.– राहुल महिवाल, महानगर आयुक्त…















