न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑगस्ट २०२३) :- जुन्या भांडणाचा राग मनात धरून काही एक न बोलता अनोळखी इसमापैकी एकाने फिर्यादीच्या उजव्या पायाच्या मांडीवर, व दुस-याने ‘आज याला जिवंत सोडायचे नाही’ असे बोलून उजव्या बाजुस कमरेवर कशाने तरी मारुन जखमी केले.
तसेच कोयत्याने ठार मारण्याच्या उद्येशाने तो डोक्यात मारला. परंतु फिर्यादीने त्याचा डावा हात आडवा घातल्यामुळे कोयत्याचा वार फिर्यादीच्या डाव्या हाताच्या मनगटावर लागला. त्यात फिर्यादीला गंभीर दुखापत होऊन ते जखमी झाले आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार (दि. २२) रोजी दुपारी २.३० च्या सुमारास काळेवाडीतील रहाटणी फाटा येथील रिक्षा थांब्यावर घडला.
फिर्यादी दिपक नाथा मिसाळ (रिक्षा चालक) यांनी आरोपी सौरभ विकास साठे व त्याचे दोन मित्र यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलसांनी ८२८/२०२३ भादवी कलम ३०७,३४ भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पो.अधि. कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करीत एकाला अटक केली आहे. पोउपनि सुर्यवंशी पुढील तपास करीत आहेत.












