- महापालिका निवडणुक कधी होईल; याबाबतीतही केले भाष्य…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑगस्ट २०२३) :- ‘विधानसभा आणि लोकसभा आपण महायुतीतर्फे लढणार आहोत. आपल्याकडे पक्ष आणि चिन्ह आहे. महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच काय? असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण येईल. या पूर्वी काँग्रेस पक्षासोबत आघाडी होती ती परिस्थिती राहील, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
अजित पवार यांचा आज पिंपरी चिंचवड शहरात नियोजित दौरा होता. त्या दरम्यान ते चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहात कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, त्या- त्या जिल्ह्यातील, तालुक्यातील, शहरातील नेत्यांनी आणि नागरिकांनी ठरवायचं की युती करायची की एकट्याच्या ताकदीवर लढायचं. निवडून येणार असाल अशी खात्री असेल तर तुम्ही युती करू नका. मतांची विभागणी न होता युती केली पाहिजे, तर युती करा. महापालिकांच्या निवडणुकांचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे, असे अजित पवार म्हणाले.
महापालिकेतील विविध कामांत भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले. त्याच्या खोलात जाणार आहे. चुकीचे काम झाल्यास कारवाई केली जाईल. आता मी पुन्हा सरकारमध्ये आलो आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी झपाटून काम करणार आहे. मी आल्यावर गर्दी होते, सुरक्षेसाठी रस्ते बंद ठेवावे लागतात. त्यामुळे निम्याच्यावर पिंपरी-चिंचवडकर झोपले असतानाच शहरात येऊन विकास कामांची पाहणी करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुणे, पिंपरी-चिंचवडमधील वर्तुळाकार मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल. निगडीपर्यंत मेट्रो येईल, ती थेट कात्रजच्या बोगद्यापर्यंत जाईल. मात्र त्यासाठी निधीची गरज आहे. तरीही मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्यावर भर राहील. पुणे-नाशिक रेल्वेचे काम गतीने सुरू आहे. शाहू-फुले-आंबेडकर ही विचारधारा मी सोडलेली नाही. ही विचारधारा आणि वारकरी संप्रदायाचा विचार सर्वांना पुढे घेऊन जाईल. सर्वधर्मसमभाव ही भूमिका आहे. सर्वांना सुरक्षित वाटले पाहिजे असे काम आम्ही करणार आहोत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष शिवसेनेसोबत जातील, असे कोणाला वाटले होते का? पण गेलोत. मी मंत्रालयात बसून काम करत होतो. राजकीय स्थित्यंतरे घडली. आम्ही सर्वांनी मिळून सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला. काहींना वेगळे वाटले. पण, हरकत नाही, असेही पवार म्हणाले.


















