मा. खा. आढळराव आणि कामगार नेते इरफानभाई सय्यद यांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑगस्ट २०२३) :- माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भोसरी विधानसभेचा नियोजित दौरा केला. विधानसभेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेवून पक्ष बांधणी आणि संघटनेवर चर्चा केली. आढळराव पाटील यांनी पालिका आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेवून भोसरी विधानसभेतील समस्या आणि विकासकामे यावर चर्चा केली.
पावसाचे दिवस असल्याने नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असल्याने त्यांना पालिका रुग्णालयात वेळेत आणि चांगले उपचार मिळावेत. रुपीनगर तळवडे रेड झोनमध्ये येत असला तरी तेथील नागरिकांना प्राथमिक सुविधा पालिकेकडून मिळाव्यात, अशी सूचना आढळराव पाटील यांनी पालिका आयुक्त शेखर सिंह यांना केली. या भागात पालिकेने आरक्षित जागा ताब्यात घ्याव्यात. त्यांचा विकास करावा, अशीही सूचना त्यांनी केली. भोसरी विधानसभेत समाविष्ट गावातील रस्त्यांची कामे त्वरित मार्गी लावावीत. चिखलीमध्ये नागरीकरण वाढले आहे. वाहतुकीसाठी रस्ते अपुरे पडतात, ट्रॅफिकचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे तेथील रस्त्यांचा विकास पालिकेने लवकर करावा. समस्त देशाचा स्वाभिमान छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाच्या कामाची माहिती त्यांनी घेतली व याच ठिकाणी संभाजी महाराज यांचा इतिहास येणाऱ्या प्रत्येक पिढीला आत्मसात करता येईल याचे रेखाटन करता येईल का ? यावर लक्ष देण्याची सूचना देखील त्यांनी केली. तसेच मोशी येथील हॉस्पिटल, बहुउद्देशीय स्टेडियम, नाशिक फाटा चांडोली कामाची माहिती पिंपरी चिंचवड मधील मराठी अनुदानित शाळांना प्रॉपर्टी टॅक्समध्ये सूट देण्यात यावी, अशा अनेक विषयांवर त्यांनी पालिका आयुक्तांबरोबर चर्चा केली.
यावेळी कामगार नेते इरफानभाई सय्यद, जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, उपजिल्हा प्रमुख संभाजी शिरसाट, भोसरी विधानसभा प्रमुख दत्तात्रय भालेराव, उपशहर प्रमुख रामदास गाढवे, बळीराम जाधव, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुनील पवार, युवासेना उपजिल्हाप्रमुख अरुण जोगदंड, महिला विधानसभा प्रमुख मनीषा परांडे, विधानसभा संघटिका जानवी पवार, वाहतूक आघाडी प्रमुख मानसिंगराव जाधव, सुरेश सूर्यवंशी, संदीप जाधव, राहुल पिंगळे आदी उपस्थित होते.












