- पंतप्रधान मोदींना दिलयं आयतचं आवतन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२३) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. माजी खासदार संजय काकडे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून पुण्यातून निवडणूक लढण्याबाबत विनंती केली आहे. तर, आमदार रवींद्र धंगेकर यांनीही दंड थोपटले आहेत. पंतप्रधान मोदी पुण्यातून निवडणूक लढत असतील, तर त्यांचा पराभव करू, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.
“जेव्हा तुम्ही गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवली, तेव्हा तेथील राज्यात ९० ते १०० टक्के यश भाजपाला मिळाले. पुण्यात तुमचा विजय १०० टक्के असून, राज्यातही भाजपाला ९० ते १०० टक्के यश मिळेल. पंतप्रधानांच्या कामांचं पुणेकरांनी कौतुक केलं आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी पुण्यातून निवडणूक लढवावी,” अशी विनंती संजय काकडे यांनी केली आहे. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
यावर रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं, “पंतप्रधान मोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं समजत आहे. आम्ही पंतप्रधानांचं पुण्यात स्वागत करतो. गेल्या ९ वर्षात देशाची वाटचाल लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे सुरू आहे. या राजकारणाला देशातील जनता त्रस्त झाली आहे. देशात महागाई असून शेतकरी आणि बेरोजगारांचे प्रश्न आहेत ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक कोणी लढायची? हे ठरेल. पक्षाने मला उमेदवारी दिली, तर विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. पंतप्रधान निवडणूक लढत असतील, तर आम्ही त्यांचं स्वागत करू. पण, निवडणूक आम्ही जिंकू,” असं थेट आव्हान रवींद्र धंगेकर यांनी दिलं आहे.












