- प्रशासनाच्या त्रुटीची शिक्षा आम्हाला? अर्जदारांची नाराजगी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२३) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून पेठ क्रमांक १२ मधील गृहयोजना क्रमांक १ व २ मधील १२० वाणिज्य दुकानांसाठी ८० वर्षाच्या कालावधीसाठी राबविलेल्या ई-लिलाव प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना काही बाबींविषयी स्पष्टता होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांच्या अर्जामध्ये त्रुटी राहिली. या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी पीएमआरडीए प्रशासनाने मुदत दिली नसल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी केल्या आहेत.
दुकानांसाठी अर्ज अंतिम तारीख १२ जुलैपर्यंत होती. तथापि, नागरिकांच्या आग्रहास्तव या प्रक्रियेस २४ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तसेच, १० ऑगस्ट रोजी संकेतस्थळावर ई-लिलाव प्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, या प्रक्रियेबाबत काही अर्जदारांनी पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
याबाबतच्या तक्रार अर्जात त्यांनी म्हटले आहे की, अर्जदारांनी बँकांचे डिमांड ड्राफ्ट काढले परंतु त्याबाबत पीएमआरडीएकडून त्यांना कोणतीही निश्चित तारीख सांगण्यात आली नव्हती. तशी जमा करण्याची तारीख सांगितली असती तर त्याच तारखेला डिमांड ड्राफ्ट जमा केला असता. त्याचप्रमाणे, अर्जदारांचे आय.टी. आर. कोणत्या वर्षाचे हवेत, याबाबतही कोणतीही स्पष्टता नव्हती. त्यामुळे अर्जदारांचा आयटीआर भरण्याबाबत देखील गोंधळ उडाला. पर्यायाने, अर्जामध्ये त्रुटी राहिल्याने त्यांना ई-लिलाव प्रक्रियेपासून मुकावे लागले. तरी, याबाबत कागदपत्रे जमा करण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी अर्जदारांनी पीएमआरडीएकडे केली आहे.













