- उन्नती सोशल फाउंडेशनच्या कार्यालयात महिलांनी बांधली भावांना राखी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२३) :-बहीण-भावांमधील प्रेम वृद्धिंगत करणारा, नातेसंबंध दृढ करणारा आणि सुदृढ भावबंधाचे रेशीम धागे असेच घट्ट राहोत, याचा शाश्वत आशावाद देणारा सण म्हणजे रक्षाबंधन आहे. विविध सणांमध्ये आपली भारतीय संस्कृती लपलेली आहे. त्यामध्येच एक आहे “रक्षाबंधन”. या नावामध्येच या शब्दाचा अर्थ लपलेला आहे. रक्षाबंधन म्हणजे सुरक्षिततेचे बंधन आहे, असे मत उन्नती सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष संजयशेठ भिसे यांनी व्यक्त केले.
उन्नती सोशल फाउंडेशनच्या सर्व महिला सभासद आणि विठाई वाचनालय तसेच राष्ट्रीय सेवा संघातील सर्व महिलांनी एकत्रित येऊन उन्नती सोशल फाउंडेशनच्या कार्यालयात रक्षाबंधन सण साजरा केला. बहीण आपल्या भावाच्या दिर्घायुष्यासाठी भावाच्या हातावर राखी बांधते. तसेच आयुष्यभर आपलं रक्षण करावं, असं वचन बहिण भावाकडून घेते त्याच भावनेतून उपस्थित मान्यवरांच्या हातावर महिला भगिनींनी राखी बांधली.
डॉ. कुदाताई भिसे म्हणाल्या, महाभारतामध्ये द्रोपदीने आपल्या साडीचा पदर फाडून “भगवान श्रीकृष्ण” यांच्या बोटाला बांधला होता. ज्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या बोटांमधून रक्त येण्याचे थांबले होते. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्यामध्ये भावा-बहिणीचे नाते निर्माण झाले. त्यामुळेच हा सण म्हणजे, बहिण-भावाच्या अतुट नात्याचा सण आहे.













