- पं. अनिंदो चटर्जी यांचे नामवंत कलाकारांना आवाहन..
- निगडीतील ग.दि. माडगुळकर सभागृहात ‘मेघ मल्हार’ संगीत महोत्सवास उस्फुर्त प्रतिसाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर २०२३) :- नृत्य कला मंदिर व आनंदो चटर्जी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील कमला एज्यूकेशन सोसायटी आणि प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या वतीने निगडीतील ग.दि. माडगुळकर सभागृहात ‘मेघ मल्हार २०२३’ या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कथ्थक नृत्यांगणा तथा सिने अभिनेत्री उर्मिला कानिटकर यांना ‘नृत्यांगना अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘अश्विनी’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह व रोख २५ हजार रुपये, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच कथ्थक आणि नृत्य प्रकारात योगदानाबदल पं. नंदकिशोर कपोते यांनाही विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध ज्येष्ठ गायक पंडित अजय पोहनकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय तबलावादक तालऋषी पंडित अनिंदो चटर्जी (कोलकाता), कमला एज्युकेशन सोसायटी आणि प्रतिभा इन्स्टिट्यूट चिंचवडच्या अध्यक्षा प्रतिभा शहा, सचिव व लायन डॉ. दीपक शहा, संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते पंडित डॉ. नंदकिशोर कपोते, सिने अभिनेत्री उर्मिला कानेटकर, आरती अंकलीकर, तेजश्री अडिगे, माजी नगरसेवक अमित गावडे आदी उपस्थित होते.
पं. अनिंदो चटर्जी मार्गदर्शन करताना म्हणाले, ” संगीत क्षेत्रात अनेक कलाकार हे रसिकांची मने जिंकत यश, प्रतिष्ठा, धन कमावत आपले वेगळे स्थान निर्माण करतात. परंतू, रसिकांची सेवा करणाऱ्या कलाकारांनी घरात बसून आराम न करता नव्या, होतकरू तरुण पिढीसाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृतीरूपी पुढाकार घेतला पाहिजे. तरच संगीत, नृत्य, गायन, वादन क्षेत्र जिवंत राहील. आज लहान मुलांच्या कलागुणांचा विकास करणे गरजेचे आहे. रसिकामधील धनिकांनी देखील संगीत, नृत्य, गायन संस्थाना भरीव मदत केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पं. अजय पोहनकर म्हणाले, ” या प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची आज कलेला गरज आहे. महापालिकेने उभरत्या कलाकारांसाठी भव्य सभागृह बांधले, त्याबद्दल महापालिकेचे आभार.
प्रमुख संयोजक डॉ. दीपक शहा म्हणाले, एक कलाकार म्हणून रसिकांच्या पसंतीस येण्यासाठी कलाकारांना नित्य रियाज आणि साधना क्रमप्राप्त ठरते. त्यामुळेच कलाकार घडतो आणि त्याची कलाही अमर होते. अशा थोर कलाकारांच्या व्यासपीठावर आज उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली, ही खरोखरच माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.
सत्कारमुर्ती, अभिनेत्री उर्मिला कानेटकर पुरस्काराला उत्तर देताना म्हणाली, ”आजच्या पुरस्काराने मी खरोखरच भारावून गेले आहे. नृत्य व अभिनय या दोन्ही क्षेत्रात काम करताना आव्हानं येतात. आजवर त्या आव्हानांवर मात करीतच मी कलेची साधना करीत आले आहे. त्याचे फलित म्हणजे माझे चाहते आणि रसिकवर्ग आहेत. या पुरस्काराबद्दल संयोजकांचे मी मनस्वी आभार मानते.
तेजश्री अडिगे यांनी प्रास्ताविकात, सन २०१० पासून ‘मेघ मल्हार संगीत महोत्सवा’चे आयोजन करण्यात येत आहे. पूर्वी शास्त्रीय नृत्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात तशी सोय नव्हती. ते शिकण्यासाठी पुण्याला जावे लागते असे. पिंपरी चिंचवड शहरात शास्त्रीय नृत्याची पाळेमुळे रोवण्यासाठी नृत्य कला मंदिराच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. त्यासाठी ‘मेघ मल्हार संगीत महोत्सव’ हा ‘माईल स्टोन’ ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
निलेश पुरोहित यांनी सरोद वादन केले. त्यांना तबल्याची साथ पं समीर सूर्यवंशी यांनी दिली. सिने अभिनेत्री उर्मिला कानेटकर हिने ‘ताल तीन ताल, मयूर पंखगत, ठुमरी, भजन’ इतर कलाकारांच्या मदतीने सादर केले. त्याला उपस्थितांनी दिलखुलास टाळ्या वाजवून दाद दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्ना दहिवेलकर यांनी तर, आभार अविनाश अडिगे यांनी मानले.















