- गेली दहा वर्ष रखडलेल्या बीआरटी मार्गातील मोठा अडथळा दूर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ सप्टेंबर २०२३) :- पूर्णपणे जागा ताब्यात न आल्याने काळेवाडी ते देहू-आळंदी बीआरटी मार्ग रखडला होता. तथापि, अडसर ठरणाऱ्या कंपनीला एमआयडीसीचा पर्यायी भूखंड उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. त्यामुळे गेली दहा वर्षे रखडलेल्या बीआरटी मार्गातील मोठा अडथळा आता दूर झाला आहे.
शहरातील सार्वजनिक प्रावासी वाहतूक गतीमान करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात बस रॅपिड इन्झट सिस्टिम (बीआरटीएस) प्रकल्पाचे जाळे तयार केले. या प्रकल्पाला २०१२ मध्ये सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात औंध-रावेत आणि दापोडी-निगडी बीआरटी मार्ग सुरू करण्यात आले. तर, दुसऱ्या टप्प्यात भोसरी-वाकड आणि काळेवाडी ते देहू-आळंदी मार्गाचे काम हाती घेण्यात आले. काळेवाडी ते देहू-आळंदी बीआरटी मार्गासाठी लागणारी जागा ताब्यात नसताना महापालिका प्रशासन आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी काम सुरु करण्याची घाई केली. हा रस्ता काळेवाडी ते चिंचवड येथील ऑटो क्लस्टर पर्यंत पूर्ण झाला. त्यापुढे लागणारी आयुक्त बंगल्यासमोरील औद्योगिक क्षेत्रातील जागा देण्यास इंडोलीन अॅरॉसिटी या बारा कंपन्यांच्या समूहाने नकार दिला.
दरम्यान, जागा घेण्यासाठी पालिकेकडून अनेक प्रयत्न झाले. मात्र, त्यामध्ये पालिकेला अपयश आले. त्यामुळे याठिकाणचा सुमारे ८० मीटरचा रस्ता विकसित नसल्यामुळे पालिकेने मोहननगर मार्गे केएसबी चौकातून पुढे बीआरटी बस सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज रोजी याच मार्गाने बीआरटीच्या बसेस धावतात. तथापि, दहा वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर रस्त्याची अपेक्षित जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संबंधित कंपनी समूह पर्यायी जागेत स्थलांतरित झाल्यानंतर रिकामा होणारा भूखंड पालिकेच्या ताब्यात येणार आहे. त्यानंतर नव्याने निविदा काढून रखडलेल्या काळेवाडी ते देहू-आळंदी बीआरटी मार्गाचे काम मार्गी लागणार आहे. त्याकरिता प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुढील एक वर्षाचा कालावधी अपेक्षित आहे. सुमारे ८० मीटर बीआरटी रस्ता तयार करण्यासाठी सुमारे १ कोटी रुपये अपेक्षित खर्च होणार आहे.
बारा कंपन्यांना दिला पर्यायी भूखंड..
संबंधित कंपनीच्या स्थलांतरासाठी अन्य ठिकाणी पर्यायी भूखंड उपलब्ध करून देण्याकरिता पालिकेने एमआयडीसीकडे पत्रव्यवहार केला. गेली दहा वर्षे पाठपुरावा केल्यानंतर एमआयडीसीने जवळील केएसबी चौक परिसरातील औद्योगिक क्षेत्रासाठी आरक्षित भूखंड संबंधित कंपनी समुहाला देण्याची प्रक्रिया हाती घेतली. त्याबाबत संबंधित कंपनी समूह आणि एमआयडीसी यांच्यात कायदेशीर लिस्ट ऑफ अॅग्रीमेंट पूर्ण झाले आहे. रस्त्यासाठी आयुक्त बंगल्यासमोरील अपेक्षित सुमारे ८० मीटर जागेपोटी पालिकेने ७.५ कोटी एमआयडीसीला अदा केले आहेत.
बीआरटी मार्गात असलेल्या बारा कंपन्यांच्या समुहाला पर्यायी जागा देण्यात येत आहे. त्यासाठी कंपनी आणि “एमआयडीसी यांच्यात लिस्ट ऑफ अॅग्रीमेंट पूर्ण झाले आहे. कंपनी स्थलांतर झाल्यानंतर जागा ताब्यात येईल. त्यानंतर नव्याने निविदा काढून सुमारे ८० मीटर रस्त्याचे काम मार्गी लावले जाईल. – प्रमोद ओंबासे, सह शहर अभियंता, बीआरटी















