- प्रवाशांसाठी होणार पास केंद्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ सप्टेंबर २०२३) :- पीएमपी प्रशासनाकडून पीएमआरडीए हद्दीतील प्रवाशांनादेखील आता मासिक पास सुविधा देण्यात येणार आहे. पीएमपीएमएलची संचालक मंडळाची गुरुवारी बैठक पार पडली.
या बैठकीत याबाबतचा निर्णय मंजूर करण्यात आला. यावेळी पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर व अन्य उपस्थित होते.
पुणे शहर आणि पिंपरी- चिंचवडकरांनाच पीएमपी प्रवासासाठी मासिक पास देण्यात येत होते. मात्र, आता या निर्णयामुळे पीएमआरडी हद्दीतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. बैठकीत या प्रशासनाच्या वतीने १५ विषयांचे ठराव संचालक मंडळासमोर मांडले होते. यातीलच या ठरावाला संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. या पासचे दर लवकरच ठरविण्यात येणार असून, पीएमपीकडून पीएमआरडीए हद्दीतील प्रवाशांकरिता पास केंद्रदेखील उपलब्ध करण्यात येणार आहेत.
पीएमपी प्रशासन पूर्वी ताफ्यातील बस ७ लाख किलोमीटर आणि १० वर्षानंतर स्क्रॅप करत होते. त्या कालावधीमध्ये आता वाढ करण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. त्यानुसार आता ८.४० लाख किलोमीटर आणि १२ वर्षांनंतर या बस स्क्रॅप केल्या जाणार आहे.
पीएमपीच्या विविध मालमत्तांचा व्यावसायिक तत्त्वावर विकास करण्यात यावा, त्याकरिता त्याचे अधिकार पीएमपीएमएलचे अध्यक्ष यांना देण्याचा ठराव होता. याला संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता पीएमपीच्या मालमत्ताचा विकास करण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे.


















