न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ सप्टेंबर २०२३) :- श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त रावेत येथील इस्कॉन मंदिरामध्ये दोन दिवसीय महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा व सात सप्टेंबर रोजी आयोजित महामहोत्सवात भजन-कीर्तन, अभिषेक, महाआरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या महामहोत्सवाच्या दोन्ही दिवशी पहाटे साडेचारपासून ते रात्री साडेबारापर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असणार आहे. या दिवशी सायंकाळी पाच वाजता भजनाने कार्यक्रमांना सुरवात होईल. भगवान श्रीकृष्णाचा अभिषेक अभिषेक पार होईल. नैवेद्य म्हणून छप्पन भोग भगवंतांना अर्पण करण्यात येतील. मध्यरात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्णाची महाआरती होईल. या दोन्ही दिवशी आलेल्या सर्व भक्तांना महाप्रसाद दिला जाणार आहे.
धार्मिक कार्यक्रमांबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहेत. या वेळी सादर केले जाणारे शास्त्रीय नृत्य, कृष्णलीलांवर आधारित नृत्य-नाटिका आणि पारंपरिक समाज प्रबोधनात्मक भजने व गीते, वक्तृत्व स्पर्धा हे या महामहोत्सवाचे खास वैशिष्ट्य असणार आहे. महोत्सवाची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतलेल्या सर्व कलाकारांचा गुणगौरव समारंभाने होईल.
‘श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सवासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह व महाराष्ट्र आदिवासी महामंडळाचे आयुक्त राजेंद्र भारूड उपस्थित राहणार असून, परिसरातील नागरिकांनी या उत्सवाला हजर राहावे, असे आवाहन रावेत येथील इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष जगदीश गौरांग दास यांनी केले आहे.















