न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ सप्टेंबर २०२३) :- महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर संदर्भ, प्रकरणे या स्वरूपात अभिलेख साठून आहेत. या साठलेल्या अभिलेखांमुळे कामकाज करण्यासाठी जागा अपुरी पडते. प्रलंबित संदर्भ व प्रकरणे वेळेवर सापडत नाहीत. त्यामुळे महापालिकेत झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल या कार्यपद्धतीच्या माध्यमामधून अभिलेखन, अभिलेखाचे वर्गीकरण करणे, ते नष्ट करण्यासाठी दि. २८ ऑगस्ट ते दि. ११ सप्टेंबर २०२३ अखेर अभिलेख सुरक्षा पंधरवडा राबविण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी काढला आहे.
महापालिकेतील विविध विभागांनी त्यांच्याकडील नस्त्याचे अभिलेखामध्ये वर्गीकरण करून अ ब, क, ड वर्गीकरण केलेल्या नस्त्या अभिलेख कक्षाकडे पाठविणे आवश्यक आहे. नस्त्या अभिलेख कक्षाकडे व ज्या नस्त्यांचीआवश्यकता नाही, अशा नस्त्या नष्ट केल्या नाहीत. अभिलेखाचे वर्गीकरण करणे, ते नष्ट करण्याबाबत विभागप्रमुखांसह अन्य अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची बाब आयुक्त सिंह यांच्या निदर्शनास आली आहे.
अभिलेखन, अभिलेखाचे वर्गीकरण करणे, नष्ट करण्यापूर्वी अभिलेख कक्षातील अभियानापूर्वीची परिस्थिती, अभियानाच्या कालावधीतील परिस्थिती याची फोटोग्राफी व व्हिडीओ रेकॉर्डिंग करून ते जतन करण्यात यावे. विभागप्रमुखांनी अभिलेखे सहा गठ्ठे पद्धतीप्रमाणे ठेवण्याबाबत निर्देश तसेच प्रशिक्षण द्यावे. अभिलेखे जतन करून ठेवण्यासाठी वर्गीकरणाप्रमाणे कालावधी निश्चित केला आहे.















