न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२३) :- मागील तीन दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या. त्यामध्ये तीन पोलीस निरीक्षकांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली होती. त्या निरीक्षकांची शुक्रवारी (दि. ८) पदस्थापना करण्यात आली आहे.
४ सप्टेंबर रोजी झालेल्या बदल्यांमध्ये अजित लकड़े (गुन्हे शाखा), दीपक शिंदे (गुन्हे शाखा), अशोक कदम (चाकण वरिष्ठ पोलीस निरीक्षक), संतोष कसबे (महाळुंगे -गुन्हे) युनूस मुलानी (चाकण गुन्हे), शंकर बावर (वाहतूक शाखा), वैभव शिंगारे (गुन्हे शाखा), मनोज खंडाळे (वाहतूक शाखा), शहाजी पवार (वाहतूक शाखा) यांचा समवेश होता.
गुन्हे शाखेत बदली केलेल्या निरीक्षकांना स्वतंत्र विभागाचा पदभार देण्यात आला नव्हता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार हे सेवानिवृत्त झाल्याने अंमली पदार्थ विरोधी पथकाचा अतिरिक्त कार्यभार गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक संतोष पवार यांच्याकडे देण्यात आला होता. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून चाकण येथून बदलून आलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
तत्कालीन दरोडा विरोधी पथकाचे प्रमुख रामदास इंगवले यांची बढतीने बदली झाली. या विभागाचा अतिरिक्त कार्यभार गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्याकडे होता. या ठिकाणी दीपक शिंदे यांची पदस्थापना करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.















