- ” ना नफा ना तोटा ” या तत्त्वावर शिवसेना देणार पर्यावरणपूरक मातीच्या गणेशमूर्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२३) :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. घरगुती गणेशाची मूर्ती ही शाडूच्या मातीची किंवा साध्या मातीची असावी, असेही त्यांनी सुचविले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद यांच्या संकल्पनेतून गणेशभक्तांसाठी शहर शिवसेनेच्या वतीने ” ना नफा ना तोटा ” या तत्त्वावर पर्यावरणपूरक मातीच्या गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
यामध्ये दगडूशेठ, सिंहासन, टिटवाळा, फेटा, मुकुट, अंभूजा या स्वरुपात गणेशमूर्ती उपलब्ध असणार आहेत. पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या सहकार्यातून हे अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेच्या माध्यमातून प्रसिद्धीस देण्यात आली आहे.
इरफानभाई यांनी म्हटले आहे की, ”गणपती हे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करून त्याची मनोभावे पूजा केली जाते. कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा होणे ही काळाची गरज आहे. यासाठी आपण सर्वांनी आग्रही राहिले पाहिजे. प्रत्येकाने आपला दृष्टिकोन पर्यावरणस्नेही ठेवला तरच उत्सव साजरे करण्याबाबत सामाजिक परिवर्तन होऊ शकेल. यासाठी शिवसेनेच्या वतीने ” ना नफा ना तोटा” या तत्त्वावर पर्यावरणपूरक मातीच्या गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे पर्यावरणाची हानी न होता इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा होण्यास सर्वांचा हातभार लागेल आणि पर्यावरणाचे देखील रक्षण होईल, त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
शाडूच्या मूर्तीसाठी स्टॉलधारकांनी शिवसेनेचे दत्तात्रय भालेराव (8624866633), अरूण जोगदंड (9284049077), सुनील पवार (9421666900) यांच्याशी संपर्क साधावा, असे पत्रकात म्हटले आहे.















