न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ सप्टेंबर २०२३) :- बालकामधील मृत्यु व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. तथापि, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, अर्धवट लसीकरण झालेले तसेच लसीकरण न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यु पावतात तसेच केंद्रशासनाने डिसेंबर २०२३ पर्यत गोवर रुबेला आजाराचे दूरीकरण करण्याचे धेय निश्चित केले आहे. यासाठी केंद्र शासनाने माहे ऑगस्ट २०२३ पासून ३ फे-यांमध्ये सर्व जिल्हे व महानगरपालिकामध्ये “विशेष मिशन इंद्रधनुष ५.०” कार्यक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या सर्व बालकांचे व गरोदर माता यांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण करण्याबाबत सुचित करण्यात आले आहे.
अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, कुटुंब कल्याण, माता बाल संगोपन व शालेय आरोग्य पुणे यांचे कडील दि. ३० जून २०२३ रोजीच्या मार्गदर्शक सुचनेनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये “विशेष मिशन इंद्रधनुष मोहिम” २०२३ खालील प्रमाणे राबविण्यात येणार आहे. या पैकी पहिली फेरी माहे ऑगस्ट २३ मध्ये पूर्ण झाली आहे. पुढील दोन फेऱ्या खालीलप्रमाणे राबविण्यात येणार आहेत.
दुसरी फेरी ११ ते १६ सप्टेंबर २०२३ तर तिसरी फेरी ०९ ते १४ ऑक्टोबर २०२३…
सदर मोहिमे संदर्भात दिनांक ४ व ५ जुलै २०२३ रोजी राज्यस्तरीय प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे. दिनांक १० ते १५ जुलै २०२३ या कालावधीत मनपातील जेष्ठ तसेच प्रभारी वैद्यकिय अधिकारी, पी.एच.एन, सिनिअर एएनएम, एएनएम व आशा स्वयंसेविका यांचे प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे.
सर्व नागरीकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचे वयोगटानुसार लसीकरण झालेले नसल्यास त्यांनी आपल्या घराजवळील पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालय अथवा दवाखान्यातील वैद्यकिय अधिकारी यांचेशी संपर्क साधुन बालकांचे मोफत लसीकरण पुर्ण करुन घेऊन मोहिम यशस्वी करण्यास सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनी केले आहे.