- महापालिकेने खासगी संस्थांकडून मागविले प्रस्ताव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिका जुनी भाजी मार्केट, क्रोमा शेजारील आणि चिंचवड स्टेशन येथील मोक्याच्या तीन जागा खासगी संस्थांना पार्कींग, वाणिज्य वापरासाठी बीओटी तत्वावर (बांधा, वापरा आणि हस्तांतरण) या पध्दतीने देण्यात येणार आहे. ही जागा ३० वर्षांसाठी देण्यात येणार असून खासगी संस्थांकडून यासाठी पालिकेने प्रस्ताव मागविले आहेत.
महापालिका अर्बन स्ट्रीटनुसार शहरातील काही महत्वाच्या रस्त्यावरचे फुटपाथ विकसित करणार आहे. मात्र, बहुतांशी रस्त्यावर फुटपाथवर अतिक्रमण, वाहने पार्क केली जातात. शहरातील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांसाठी पार्किंगही उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे. त्याच दृष्टीने पिंपरी पुलाशेजारील जुनी भाजी मार्केट आरक्षण क्रमांक १३६ असून जागा ५६०० चौरस मीटर आहे.
क्रोमा शेजारील आरक्षण क्रमांक ११७ येथील २४८७.१५ चौरस मीटर आणि चिंचवड रेल्वे स्टेशन येथील आरक्षण क्रमांक १८६ येथील ३९१०.५३ चौरस मीटर जागेवर पार्किंगचे आरक्षण आहे. याठिकाणी पार्किंग निर्मितीसाठी तीन वेळा निविदा मागविली होती. मात्र, जागा, डिझाइन, वाणिज्य वापर नसल्याने तीनही वेळेस ठेकेदाराचा प्रतिसादच मिळाला नाही. त्यामुळे नव्याने प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत. त्यात यांत्रिकी पद्धतीने पार्किंग, व्यावसायिक वापर आणि ५०० मीटर परिसरातील जागेवरील नो पार्किंगवरही ठेकेदारी संस्थेचे नियंत्रण राहणार आहे. यासाठी संबंधित ठेकेदाराला वाहतूक पोलिसांची मदत देण्यात येणार आहे, असे महत्वाचे काही बदल करण्यात आले आहेत.
‘मल्टी लेव्हल पार्किंग कम कमर्शिअल डेव्हलपमेंट’ सुविधेचे डिझाईन, बिल्ट, फायनान्स, ऑपरेट आणि हस्तांतरण यासाठी प्रस्ताव मागविले आहेत. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या (बीओटी) तत्वावर जागा विकसित करता येणार आहे. संस्थेला ३० वर्षांसाठी जागा दिली जाणार आहे. युडीपीसीआर नियमाधीन बांधकाम करावे लागणार आहे. पार्किंगची संख्या महापालिका ठरवून देणार आहे. उर्वरित जागेचा व्यावसायिक कारणासाठी वापर करता येणार आहे. उत्पन्नाचा जास्तीत जास्त वाटा महापालिकेला देणाऱ्यालाच प्राधान्य दिले जाणार आहे.
रस्त्यावरील पार्किंगमुळे अपघात होत आहेत. वाहतूक कोंडीत भर पडून वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. नागरिकांना पार्किंगमध्येच वाहने लावण्याची शिस्त लागेल. ५०० मीटर अंतरावर नो-पार्किंग असणार आहे. सह. शहर अभियंता – प्रमोद ओंबासे…















