न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२३) :- अडीच वर्षांपूर्वी वाकड ते बालेवाडी दरम्यानचा नियोजित पूल झाला. पण, त्याला जोडणाऱ्या केवळ सहा गुंठ्यांचे भूसंपादन रखडल्याने रस्त्याचे काम झालेच नाही. परिणामी तब्बल ३१ कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या या पुलावरून सुमारे अडीच वर्षांपासून वाहतूक सुरू झालेली नाही. त्यामुळे वाकड, बालेवाडी, बाणेर या भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून, सध्यातरी अडगळ बनलेला हा पूल अनेक अवैध धंद्यांचे आगार बनला आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला जोडणाऱ्या मुळा नदीवरील चार पदरी पुलाचे काम असंख्य अडथळ्यांनंतर पूर्ण झाले. दोन्ही महापालिकांनी ३१ कोटींपैकी समांतर खर्चाच्या अटीवर २०१३ अखेरीस १७५ मीटर लांब आणि ३० मीटर रुंदीच्या पुलाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली होती. २०२० मध्ये पुलाचे काम पूर्ण झाले. मात्र, किरकोळ भूसंपादनामुळे हा पूल धूळखात आहे.
वाकड, सांगवी, चतु:शृंगी या तीनही पोलिस ठाण्यांच्या हद्दींना जोडणारे शेवटचे टोक अन् सहजासहजी कोणाचे लक्ष जात नसल्याने अडगळ बनलेला हा पूल अनेक अवैध धंद्यांचे आश्रयस्थान बनला आहे. मद्यपींसाठी ही सर्वांत सुरक्षित जागा बनली आहे. पुलावर सर्वत्र बाटल्यांचा खच पहायला मिळतो. त्याबरोबर अनेकांनी जुगार, मटका व पत्त्यांचे धंदे थाटले आहेत. पुलावरील अंधाराचा फायदा घेत वेश्याव्यवसायही सुरू आहे.
पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन्ही महापालिकांचा वाकड ते बालेवाडी पूल करण्याचा संयुक्त प्रकल्प आहे. या पुलासाठी दोन्ही महापालिकांचा अर्धा-अर्धा खर्च आहे. या पुलाची लांबी २३६ मीटर तर रुंदी ३० मीटर असून, सात स्पॅन आहेत. या पुलाच्या कामासाठी २९ जून २०१३ रोजी निविदा काढली होती. त्या वेळी प्रत्येकी १५ कोटी ४२ लाख रुपये खर्च झाले; पण पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बाजूकडील जागेचे भूसंपादन न झाल्यामुळे या पुलांचे काम थांबविण्यात आले. या पुलाच्या उर्वरित कामासाठी ३० ऑगस्ट २०१९ रोजी दुसऱ्यांदा निविदा काढण्यात आली. त्यावर पुणे महापालिकेचे ८ कोटी २४ लाख रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे गेल्या नऊ वर्षात या पुलावर २३ कोटी ६६ लाख रुपये खर्च झाले आहेत.
महापालिकेच्या बालेवाडी ते वाकड या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, एक-दोन ठिकाणची जमीन मोबदल्याअभावी ताब्यात आली नाही. त्यामुळे अद्याप रस्ता होऊ शकला नाही. जागा मालकांशी समन्वय साधून, यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पावसाळ्यानंतर काम सुरू होण्याची चिन्हे आहेत.
– अजय वायसे, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग, पुणे महापालिका.
दरम्यान हा पूल खूला करण्यासाठी नागरिकांनी वाकड-बालेवाडीतील नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल केली आहे.















