न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२३) :- आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची बैठक रामकृष्ण मंगल कार्यालय, पिंपळे गुरव येथे (दि. १३) आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला शांतता समिती सदस्य, महीला दक्षता कमिटी, मोहल्ला कमिटी, पोलीस मित्र तसेच गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलिस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशनचे पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष विशाल क्षीरसागर यांच्या हस्ते सांगवी पोलीस स्टेशनचे पीआय पोळ यांना संविधान देऊन सन्मानित करण्यात आले.
या बैठकीत मिरवणुकी दरम्यान कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याअनुषंगाने योग्य त्या मार्गदर्शन करून सूचना देण्यात आल्या. रहदारीच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याकरिता जास्तीत जास्त ओळखपत्रसह स्वयंसेवक नेमावे, मंडळातर्फे आक्षेपार्ह देखावे लावू नये, जबरदस्तीने वर्गणी, आक्षेपार्ह घोषणाबाजी, गाणे वाजवू नये याबाबत सूचना देण्यात आल्या. विसर्जन मिरवणुकीत साउंड सिस्टीम, डिजे/ डॉल्बीचा वापर करणार नाहीत. सर्व परवाने घेऊनच उत्सव साजरा करावा. तसेच सुरक्षिततेच्या अनुषंगाने योग्य त्या उपाययोजना करणेबाबत गणेश मंडळाचे पदाधिकारी यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.
आभार विशाल जाधव यांनी मानले.