न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२३) :- पतीच्या त्रासाला कंटाळून शिक्षिकेने इमारतीच्या सहाव्या ‘मजल्यावरून उडी मारली. यात गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिक्षिकेच्या पतीवर गुन्हा दाखल केला. भोरवाडी, माणगाव येथे गुरुवारी (दि. १४) रात्री पावणे बाराच्या सुमारास ही घटना घडली.
पूजा कुमारी (२८), असे मयत शिक्षिकेचे नाव आहे. रामधनी प्रसाद (६२, रा. झारखंड) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रकाश कुमार (रा. भोईरवाडी, माणगाव, ता. मुळशी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामधनी यांची मुलगी पूजा कुमारी ही खासगी शाळेत शिक्षिका होती. तसेच तिचा पती प्रकाश कुमार हा इंजिनिअर असून आयटी कंपनीत नोकरीला आहे. पूजा कुमारी हिला नोकरी करण्याची इच्छा असताना तिला पती प्रकाश याने जाणीवपूर्वक नोकरी सोडण्यास भाग पाडले. पूजा कुमारी नोकरी करीत असताना पती प्रकाश तिला नोकरीच्या वेळेत घरातील कामे सांगत होता. तिला व्यस्त ठेवून नोकरीवर जाण्यास अडवणूक करत असे. मानसिक त्रास देऊन घालून पाडून बोलून पगारावरून अपमानित करत असे. या त्रासाला कंटाळून तिने घराच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. गंभीर जखमी झाल्याने उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पूजा कुमारी ही पती प्रकाश कुमार याच्या त्रासाला कंटाळली होती. प्रकाश कुमार याने तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले, असे रामधनी प्रसाद यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक अजित काकडे तपास करीत आहेत.