- शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना कौशल्य दाखविण्याची संधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२३) :- पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८ वी) या परीक्षांच्या अभ्यासक्रमानुसार विषयनिहाय, घटकनिहाय प्रश्नपेढी राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात येणार आहे. परीक्षेच्या अनुषंगाने विषयनिहाय, घटकनिहाय दर्जेदार प्रश्नांची निर्मिती करण्याच्या दृष्टीने राज्यातील प्रतिभावान, अनुभवी शिक्षक, सेवानिवृत्त अधिकारी, महाविद्यालयीन प्राध्यापक तसेच इतर विषयांतील तज्ज्ञ व्यक्तींना आपले कौशल्य दाखविण्याची संधी आहे.
राज्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना राज्य सरकारतर्फे प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी राज्य परीक्षा परिषदेकडून दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या रविवारी परीक्षेचे आयोजन केले जाते. या परीक्षेसाठी अभ्यासक्रमानुसार विषयनिहाय, घटकनिहाय प्रश्नपेढी तयार करण्याचे नियोजन परीक्षा परिषदेकडून करण्यात येत आहे. मराठीमध्ये टंकलिखित करताना मंगल अथवा युनिकोड फॉन्ट वापरावा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सबमिट करावे. कोणत्याही प्रकारचे कितीही प्रश्न अपलोड केले जाऊ शकतात. प्रश्न निर्मिती करताना प्रश्नाचा दर्जा, अचूकता, सप्रमाणता, निःसंदिग्धता, काठीण्यपातळी व शुद्धलेखन याची दक्षता घ्या या सूचना परीक्षा परिषदेतर्फे केल्या आहेत.
अशी करा नोंदणी…
प्राश्निकाने प्रथम https://www.mscepune.in/ या परिषदेच्या संकेतस्थळावर स्वतःची माहिती भरुन नोंदणी करावी. नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकावर प्राप्त लॉगिन आयडी व पासवर्ड वापरुन लॉगिन करावे. प्रश्नपेढी निर्मिती या मथळ्याखाली शिष्यवृत्ती परीक्षा हा पर्याय निवडून योग्य ती इयत्ता / माध्यम / विषय / घटक / उपघटक निवडावा. प्रश्न केवळ शिष्यवृत्तीच्या नेमून दिलेल्या घटकावरच आधारित असावा. निर्मित केलेला प्रश्न, त्याचे चार पर्याय, त्यापैकी उत्तराचा योग्य पर्याय क्रमांक, उत्तराचे स्पष्टीकरण व त्याविषयीचे संदर्भ आणि आधार इत्यादी सर्व माहिती नोंदवावी. स्वतः टंकलिखित करुन अथवा कागदावर प्रत्यक्ष लिहून पीडीएफ स्वरुपात अपलोड करावी.












