- माजी सभापती धनंजय भालेकर यांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२३) :- त्रिवेणीनगर, तळवडे भागात वाहतूक समस्येला स्थानिक नागरिक व वाहनचालकांना दररोज सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्रिवेणीनगर- तळवडे मार्गाला पर्यायी रस्ता तयार करावा, अशी मागणी शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर यांनी रविवारी (दि. २४) रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, त्रिवेणीनगर ते तळवडे रस्ता रहदारीचा बनला आहे. चाकण एमआयडीसी आणि देहू-आळंदी या मुख्य मार्गाला हा रस्ता जोडला जातो. त्यामुळे या मार्गावर कायमस्वरुपी वाहनांची वर्दळ असते. सकाळी व सायंकाळी त्रिवेणीनगर, तळवडे चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना अनेकदा अपघात झाले आहेत. तसेच स्थानिक नागरिकांना प्रदूषणाचाही खूप त्रास सहन करावा लागत आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे समाविष्ट गावांच्या विकासासाठी महापालिकेने तयार केलेला डीपी प्लॅन विकसित करावा. तसेच महापालिकेने केलेल्या डीपी प्लॅनमध्ये जे रस्ते आरक्षित आहेत. ते रस्ते त्वरित विकसित करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन ही समस्या त्वरित सोडवावी, अशी मागणी भालेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली आहे.















