न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑक्टोबर २०२३) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांची पात्रता तपासण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय लवाद अर्थात ‘मॅट’ने दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने पात्रता तपासून पुन्हा प्रतिनियुक्तीवर अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली. त्यामुळे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदाच्या सुरूअसलेल्या नाट्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
उपायुक्त स्मिता झगडे यांची १३ सप्टेंबर २०२२ रोजी राज्य शासनाने अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली. परंतु, आयुक्त शेखर सिंह यांनी नऊ दिवस झगडे यांना रुजू करून घेतले नाही. राज्य शासनाने २२ सप्टेंबर २०२२ रोजी झगडे यांची नियुक्ती रद्द करून प्रदीप जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली.
झगडे यांनी जांभळे यांच्या नियुक्तीला मॅटमध्ये आव्हान दिले. मॅटने निकाल देत जांभळे यांच्या नियुक्तीबाबत २२ सप्टेंबर २०२३ पर्यंत पात्रता नियुक्तीबाबत तपासून निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. शासनाने त्यांची पात्रता योग्य असल्याचे स्पष्ट करून पुन्हा २ वर्षांसाठी त्यांची या पदावर फेरनियुक्ती केली असल्याचे आदेशात नमूद केले आहे.


















