न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२३) :- संत तुकारामनगरमधील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) गेल्या सहा महिन्यांपासून सीटी स्कॅन मशिन बंद अवस्थेत आहे. परिणामी, रूग्ण आणि नातेवाइकांना तातडीच्या उपचारासाठी महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागत आहे. काहीजण वेळेअभावी खासगी रुग्णालयांत जात आहेत. एखादा रुग्ण आल्यावर त्याला ‘सीटी स्कॅन करायचंय? मग थेरगाव रुग्णालयाकडे जा’ असे सांगण्यात येत आहे, अशी तक्रार नातेवाईक करत आहेत.
‘वायसीएम’मध्ये असणाऱ्या रूबी एलकेअरमार्फत रुग्णांचे सीटी स्कॅन केले जाते. अपघातग्रस्त, तातडीचे व जोखमीच्या रुग्णांचे तत्काळ सीटी स्कॅन आवश्यक असते. अशावेळी पिवळी शिधापत्रिका असणाऱ्यांना सीटी स्कॅन मोफत आहे. तसेच, इतर रुग्णांना सीटी स्कॅनसाठी १२०० रुपये खर्च येतो. मात्र, सध्या खासगी रुग्णालयात या उपचारासाठी अडीच ते तीन हजार रुपये रुग्णांच्या नातेवाइकांना मोजण्याची वेळ आली आहे.
शहराबाहेरील रुग्णही अत्यल्प दरात उपचार मिळत असल्याने उपचारासाठी येत असतात. खासगी रुग्णालयांच्या तुलनेत ‘वायसीएम’मध्ये कमी दरात व सवलतीत सीटी स्कॅन करून मिळते. दिवसाकाठी २५ ते ३० रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येतात. यातील काही अत्यवस्थ असतात. त्यांना इतरत्र हलवता येत नाही. त्यामुळे, रुग्णांना नाहक त्रास होत असल्याने नातेवाइकांनी हळहळ व्यक्त केली. गेल्या ५-६ महिन्यांपासून ‘वायसीएम’मधील सीटी स्कॅन मशिन बंद ठेवल्या आहेत, पण नागरिकांना माहीत नसल्यामुळे रात्री अपरात्री लोक रुग्णांना सीटी स्कॅनसाठी येत आहेत. त्यांना तेथून थेरगाव रुग्णालयांकडे जाण्यास सांगण्यात येत आहे, असे योगेश पाटील यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
- ‘‘सीटी स्कॅन खोलीचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. नवीन मशिन उपलब्ध झाल्या आहेत. नवीन तपासणी करण्यात येत असल्याने साधारणत: १५ ते २० दिवसांत सिस्टिम सुरू होईल. ’’
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय













