न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२३) :- श्रीमंत नावलौकिक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेत आता कंत्राटी क्रीडा शिक्षक हे विद्यार्थी खेळाडू घडविणार आहेत. अकरा महिन्यांसाठी नेमण्यात येणाऱ्या क्रीडा शिक्षकांसाठी तब्बल १ कोटी १७ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेता इतका मोठा खर्च करून या माध्यमातून किती खेळाडू तयार होणार? हा संशोधनाचा विषय आहे.
महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने २४ शाळा आणि ८ आदर्श शाळा असे एकूण ३० शाळांसाठी क्रीडा शिक्षक पुरविण्यासाठी १ कोटी १० लाख ८८ हजार खर्चाची प्राथमिक शिक्षण विभागाने निविदा राबविली होती. त्यासाठी ३ पुरवठादारांकडून निविदा प्राप्त झाल्या. त्यातील २ निविदा पात्र ठरल्या. त्यातील किडर स्पोट्र्स एलएलपी या पुरवठादाराने ५ टक्के अधिक आणि अहमदाबाद रकेट अकादमीने १५ टक्के अधिक दराची निविदा भरली होती. किडर स्पोर्ट्सची १ कोटी १६ लाख ४२ हजार २९१ रुपये अधिक जीएसटी या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे. ठेकेदारामार्फत नेमलेले हे क्रीडा शिक्षक महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाचे प्रशिक्षण देणार आहेत. त्यातून किती खेळाडू तयार होतात, हा संशोधनाचा विषय आहे.
दरम्यान, हॉकीसह क्रिकेट, टेनिस, रोइंग, कुस्ती, घोडेस्वारी, शूटिंग, धनुर्विद्या आदी क्रीडा प्रकारांसाठी महापालिकेने स्टेडियम, हॉल व मैदाने खासगी संस्थांना देण्यात आले आहेत. त्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक क्रीडा शिक्षकास खेळांचे प्रशिक्षण देणे बंधनकारक केले आहे. तयार झालेले खेळाडू महापालिकेने सुरू केलेल्या क्रीडा अॅकॅडमीमध्ये पाठविले जाणार आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना योग्य प्रकाराचे प्रशिक्षण मिळणार आहे. कामगिरी लक्षात घेऊन महापालिकेच्या सर्व शाळांसाठी या प्रकारे क्रीडा शिक्षक नेमण्याचे नियोजन आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले.
एकूण खेळाडूंपैकी ४० टक्के खेळाडू महापालिका शाळेतील असावेत आणि त्यांना मोफत प्रशिक्षण दिले जावे, अशी अट आहे. असे असताना महापालिका स्वतः खर्च करून कंत्राटी शिक्षकांवर उधळपट्टी करीत असल्याने शंका उपस्थित केली जात आहे.
महापालिकेच्या क्रीडा विभागात अनेक क्रीडा शिक्षक आहेत. मात्र, ते विद्यार्थ्यांना खेळाचे प्रशिक्षण देणे सोडून निवडणूक विभागात ठाण मांडून आहेत. तेथे
फारसे काम नसल्याने निवडणूक विभागातून क्रीडा विभागात येण्यास शिक्षक तयार नाहीत. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाचे प्रशिक्षण मिळत नाही, जे आहेत ते विद्यार्थ्यांना प्रशिक्षण न देता इतर कामांत व्यस्त असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेचे कोट्यवधीचे स्टेडियम, क्रीडांगण, जलतरण तलाव, हॉल आणि सुविधा असूनही महापालिका शाळेत खेळाडू तयार होत नसल्याचे चित्र आहे.













