न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२३) :- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रस्ते विकास महामंडळाच्या वतीने आयटीएमएस प्रणालीच्या कामासाठी ओव्हर हेड ग्यांट्री बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी द्रुतगती मार्गावर उद्या (मंगळवार) दोन तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. यादरम्यान द्रुतगती मार्गावरील वाहतूक १२ ते २ दरम्यान बंद राहणार आहे.
द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाच्या अलीकडे किलोमीटर ४५ आणि ४५.८०० किलोमीटरवर ओव्हरहेड गॅन्ट्री बसवली जाणार असल्याने हा ब्लॉक घेतला जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
यावेळी पुण्याकडे येणारी अवजड वाहतूक खालापूर टोल नाक्यावर थांबवली जाणार आहे. तसेच हलकी वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गाकडे वळविण्यात येणार आहे. मात्र मुंबईकडे जाणारी वाहतूक मात्र सुरळीत सुरू असणार आहे.













