- ठेकेदारावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलाव, कासारवाडी येथे (दि. १०) रोजी स.८. ३० वा. क्लोरिन गॅसच्या टाकीतून क्लोरीन गॅस गळती झाली. ही बाब जलतरण तलावावरील व्यवस्थापक, जीवरक्षक यांच्या लक्षात येताच जलतरण तलावामधील एकुण १६ नागरीकांना तात्काळ तातडीने बाहेर काढण्यात आले. यापैकी १२ नागरीक, ०४ जीवरक्षक, ०१ सुरक्षारक्षक यांना श्वासनाचा त्रास जाणवू लागल्याने महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालय, पिंपरी येथे दाखल करण्यात आले आहे.
वैद्यकिय अधिका-यांच्या म्हणण्यानुसार दाखल केलेल्या सर्वाची प्रकृती स्थिर आहे. तसेच टाकीतून होणा-या गॅस गळतीवर अग्निशामक विभाग, सुरक्षा विभाग व मेस्कोचे कर्मचारी यांच्यामार्फत तातडीने नियंत्रण मिळविण्यात आले.
या जलतरण तलावातील पाणी शुद्धीकरण, परिसर स्वच्छता, साफसफाई देखभाल व यांत्रिक देखभाल दुरुस्तीचे काम मे. सुमित स्पोटर्स अॅन्ड फिटनेस इक्विपमेंटस, चिंचवड यांना नेमून दिलेले आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष पहाणी केली असता क्लोरिन गॅसची टाकी अत्यंत जूनी गंजलेली खराब अवस्थेत असल्याने याबाबत काम करणा-या एजन्सीने आवश्यक खबरदारी न घेता हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आले आहे. या एजन्सीला नोटीस दिलेली असून खुलासा घेवुन हलगर्जीपणाबाबत जबाबदार धरून सक्त कारवाई करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर नागरीकांना इजा होईल, जीवीतास धोका होइल अशी परिस्थिती निर्माण करण्यास जबाबदार असल्याने मे. सुमित स्पोटर्स अॅन्ड फिटनेस इक्विपमेंटस, चिंचवडच्या विरुध्द भोसरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात येत आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.















