न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील वायसीएम हॉस्पिटलमधील नर्सेस व पालिकेतील कंत्राटी कामगारांना बोनस कायद्यानुसार पालिकेच्या पर्मनंट कर्मचाऱ्यांप्रमाणे बोनस दीपावली पूर्वी द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कै. यशवंत मेमोरियल हॉस्पिटलमध्ये गेली ५ ते १५ वर्षमानधनावर नर्सेस सलग सेवेत काम करत आहेत. त्यांना व पालिकेतील सुमारे ५००० कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस कायद्यानुसार बोनस लागू होत आहे. त्यांना दीपावली पूर्वी बोनस द्यावा, अशी लेखी मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी शेखर सिंह आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना आज केली. बोनस कायद्यानुसार या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत विचार केला जाईल, असे सकारात्मक उत्तर आयुक्त यांनी दिले.
ही मागणी मान्य झाल्यास पालिकेत कर्तव्य बजावत असलेल्या मानधनावरील व कंत्राटी सुमारे ५५०० कर्मचायांची दीपावली आनंदात जाणार आहे,असेही भोसले यांनी सांगितले व आयुक्त शेखर सिंह हे कर्मचारी व शहरातील नागरिकांचे प्रश्नांबाबत संवेदनशील असल्याचे सांगून त्यांचे आभार देखील पत्रकार परिषदेत भोसले यांनी मांडले.
सर्व नर्सेस या राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेचे सभासद असून त्यांना बोनस कायद्यानुसार दीपावली पूर्वी महापालिकेच्या कायम कर्मचाऱ्याप्रमाणे दिल्या जाणाऱ्या बोनसची रक्कम स्वानुग्रह अनुदान समान काम समान वेतन या कायद्यानुसार देण्यात यावे.















