न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२३) :- राज्य परिवहन महामंडळाच्या पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर आगाराच्या वतीने शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त भाविकांना साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन मिळावे, म्हणून एस. टी. च्या वतीने बुधवार (दि. १८) रोजी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
पहिली गाडी सकाळी साडेसहा वाजता सोडण्यात येणार आहे. या सुविधेचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आगाराच्या स्थानक प्रमुख वर्षा डहाके यांनी केले आहे.
दर्शन यात्रा चार दिवसांची असून, यामध्ये पहिल्या दिवशी कोल्हापूर येथील महालक्ष्मीचे दर्शन. त्याच दिवशी तुळजापूर येथील तुळजा भवानीचे दर्शन व रात्रीचा मुक्काम. दुसऱ्या दिवशी माहूर येथे रेणुका माता दर्शन. माहूर येथे दुसरा मुक्काम होईल. तिसऱ्या दिवशी वणी येथील येथील चतुः श्रृंगी देवीचे दर्शन होईल. शनिवार (दि. २१) रोजी परतीचा प्रवास करीत बस पुन्हा वल्लभनगर आगारात येईल. या दर्शन बस सुविधेसाठी ग्रुप बुकिंग आणि ऑनलाईन बुकिंगची सोय उपलब्ध असून, भाविकांच्या मागणीनुसार जादा गाड्यांची सोय करण्यात येणार असल्याची माहिती आगाराच्या वतीने देण्यात आली आहे.











