न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑक्टोबर २०२३) :- पिंपरी-चिंचवड शहरामध्ये विविध भागांमध्ये शारदीय नवरात्रोत्सवास रविवारपासून सुरुवात झाली. यावेळी घराघरांमध्ये घटस्थापना करण्यात आली. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच शहर परिसरामध्ये रास दांडियाचे खेळ रंगू लागले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील देवीच्या मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मंदिरांचा परिसर रोषणाईने उजळून निघालेला आहे.
शारदीय नवरात्र उत्सवाला देवीच्या मंदिरात सुरुवात झाली. घरामध्ये रविवारी घटस्थापना करण्यात आली तसेच पुढील नऊ दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. थेरगाव कैलासनगर येथील श्री मोहटादेवी ट्रस्टच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. धर्मवीर संभाजीराजे मंच शाहूनगर ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिरात घटस्थापना करण्यात आली. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे.
आकुर्डीतील तुळजाभवानी मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय काळभोर यांनी दिली. मोहननगर येथील जय भवानी नवरात्र उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती कार्याध्यक्ष अविनाश दातीर यांनी दिली. चिंचवडमध्ये साडेतीन शक्तिपीठ दर्शन सोहळा श्री मोरया गोसावी समाधी मंदिर परिसरात आयोजित केलेला आहे. खराळवाडी येथील खराळ आई माता मंदिरात घटस्थापना करण्यात आली.















