- त्यात सर्वाधिक संवेदनशील मतदान केंद्र आहेत पिंपरीतील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२४) :- बोपखेलच्या मुळा नदीपासून उरणाच्या समुद्रापर्यंत विस्तारलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण २५ लाख ९ हजार ४६१ मतदार आहेत. तर, २ हजार ५५६ मतदार केंद्रे आहेत. त्यापैकी १४ मतदान केंद्र हे संवेदनशील आहेत. सर्वाधिक ६ संवेदनशील मतदान केंद्र पिंपरी विधानसभा मतदारसंघातील आहेत. त्या केंद्रांवर निवडणूक विभागासह पोलिस यंत्रणेचे विशेष लक्ष असणार आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.
मावळ विधानसभा मतदारसंघात ३९० पैकी केवळ १ केंद्र संवेदनशील आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५४९ मतदान केंद्र आहेत. त्यापैकी ४ केंद्र हे संवेदनशील आहेत. तर, पिंपरी विधानसभेत ४०० मतदान केंद्र आहेत. त्यापैकी सर्वाधिक ६ मतदान केंद्र हे संवेदनशील आहेत. चिंचवड विधानसभा मतदार संघातील ४ मतदान केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत.
निवडणूक आयोगाकडून आदर्श मार्गदर्शक प्रणाली ठरवून दिली आहे. त्यानुसार संवेदनशील मतदान केंद्रांवर उपाययोजना करून अंमलबजावणी केली जाते. तसेच, विशेष अधिकारी नियुक्त करून पोलिस बंदोबस्त वाढविला जातो, असे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जोशी यांनी सांगितले.
ज्या मतदान केंद्रातील एखाद्या घटनेमुळे पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. उदाहरणार्थ मतदान केंद्र बळकावणे, बोगस मतदानाचे प्रमाण अधिक असणे, दादागिरी करणे, भांडणे होणे, शिवीगाळ करणे आदी प्रकार होणे. केंद्रावर एकाच उमेदवाराला ७५ टक्के मतदान झाले असल्यास. झालेल्या मतदानांपैकी ९० टक्के मतदान एकाच उमेदवाराला झाले असल्यास. एका कुटुंबातील सदस्यांची नावे मतदार यादी सलग एकाच मतदान केंद्रावर नसणे. संवेदशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष दिले जाते. त्या केंद्रावर स्वतंत्र निरीक्षक नेमला जातो. त्या केंद्रावरील मतदानावर सीसीटीव्ही कॅमेरे लावून वेबकास्ट (ऑनलाइन प्रक्षेपण) केले जाते. तसेच, मायक्रो ऑब्दांव्हर नेमला जातो. एक अतिरिक्त पोलिस कर्मचारी तैनात केला जातो.