न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२४) :- पिंपळे गुरव येथील पवनानगर येथे मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या मोकळ्या जागेतील वाळलेल्या गवताला अचानक शुक्रवारी (दि. २६) दुपारी चारच्या सुमारास आग लागली. या वेळी रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या सात चार चाकी वाहने या आगीच्या भक्षस्थानी आली. सदर पार्क केलेल्या वाहनांच्या पुढच्या भागाला वाळलेल्या गवताच्या आगीमुळे आणखी आग लागल्याची घटना घडून आली.
पवना नगर येथील गणराज वडापाव समोरील रस्त्याच्या दुतर्फा बाजूस अचानक वणव्यामुळे वाळलेल्या गवताला आग लागली. सदर आग पार्क केलेल्या चार चाकी वाहनांजवळ येऊन वाहनांच्या पुढील बाजूने पेट घेतला. यावेळी मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाला, धूर हवेत पसरत होता. या वेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधींना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी साडे चार वाजता वल्लभनगर, रहाटणी येथील अग्निशमन विभागाचे वाहन एका पाठोपाठ घटनास्थळी दाखल झाले.
या वेळी क्षणाचाही विलंब न करता वल्लभनगर अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मात्र, तोपर्यंत येथे पार्क केलेल्या वाहनाच्या पुढील बाजूला आग लागून वाहनांचे मोठे नुकसान झाले होते.
तीन वाहनांचे पुढील टायर फुटून अक्षरशः जळून खाक झाले होते. या वेळी अग्निशमन दलाचे लिडिंग फायरमन किरण निकाळजे, फायरमन कैलास वाघिरे, भूषण येवले, वाहनचालक संतोष कदम, प्रमोद जाधव, जवान सिद्धेश दरवेश, प्रतीक खांडगे, ओंकार शिंदे, शुभम क्षीरसागर, समीर पोटे, ऋषिकेश जगताप, ओंकार रसाळ, संकेत घोगरे यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
आगीची माहिती मिळताच सांगवी पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सुनील तांबे, पोलीस कर्मचारी, पोलीस बीट मार्शल घटनास्थळी उपस्थित झाले होते.