न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२४) :- महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतल्याने मावळ लोकसभा मतदारसंघात वेगळीच चर्चा रंगली आहे.
अजित पवार हे महायुती सोबत असून श्रीरंग बारणे हे महायुतीचे उमेदवार आहेत. बारणे यांनी २०१९ ला झालेल्या निवडणुकीत पार्थ पवार यांचा दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला होता. हाच पराभव अजित पवारांसह पार्थ पवारांच्या जिव्हारी लागला होता. संजोग वाघेरे यांनी लग्नाच्या व्यासपीठावर अजित पवारांचा आशीर्वाद घेतल्याने संजोग वाघेरे यांना छुपा पाठिंबा नाही ना? अशी शहरात चर्चा रंगली आहे.
पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलीच्या विवाह प्रसंगी शुक्रवारी संध्याकाळी गाठी- भेटीचा कार्यक्रम होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर नेते ही कार्यक्रमाला हजर होते. यानिमित्ताने महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर आले. संजोग वाघेरे यांनी अजित पवारांना वाकून नमस्कार करून आशीर्वाद घेतले. यामुळे मावळ लोकसभेत वेगळीच चर्चा रंगली आहे.